इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी जाहीर करण्यात आलेल्या ३० खेळाडूंच्या संभाव्य भारतीय संघातून अनुभवी वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंगला वगळण्यात आलेले आहे. तथापि, जम्मू आणि काश्मीरचा युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूल याला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय जगदाळे यांनी जाहीर केलेल्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सेहवाग आणि हरभजनप्रमाणेच वेगवान गोलंदाज झहीर खान, तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा यांनाही स्थान देण्यात आलेले नाही.
भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेला डावखुरा फलंदाज गौतम गंभीरचा या चमूत समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल, महाराष्ट्राचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव, मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू जलाल सक्सेना आणि वेगवान गोलंदाज ईश्वर यादव अशा अनेक युवा खेळाडूंना संभाव्य भारतीय चमूत स्थान देण्यात आले आहे.
दुखापतीतून सावरलेला उमेश यादव आणि गैरवर्तणुकीमुळे बीसीसीआयच्या शिक्षेला सामोरा गेलेला प्रवीण कुमार या वंगवान गोलंदाजांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. प्रग्यान ओझाची फिरकी कसोटीसाठी अनुकूल आहे, असे निवड समितीचे मत दिसत आहे. परंतु लेग-स्पिनर अमित मिश्राला मात्र संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ (संभाव्य) : मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर, उन्मुक्त चंद, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, वृद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, जलाल सक्सेना, परवेझ रसूल, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, उमेश यादव, मोहम्मद शामी, इरफान पठाण, विनय कुमार, प्रवीण कुमार, इश्वर पांडे आणि सिद्धार्थ कौल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा