जगज्जेतेपद, जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केल्यानंतर आता आणखी एक शिखर भारतीय संघाला साद घालते आहे, ते म्हणजे चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद. भारताचा अपराजित आणि आत्मविश्वासपूर्ण प्रवास आता उपांत्य फेरीपर्यंत येऊन ठेपला आहे. आता आव्हान उभे ठाकले आहे ते उपखंडामधीलच आव्हान श्रीलंकेचे. कागदावर भारतीय संघाची ताकद अभेद्य आहे. पण यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या प्रतिस्पध्र्याना हरवून उपांत्य फेरी गाठणाऱ्या श्रीलंकेलाही कमी लेखून चालणार नाही. मुंबईत २०११मध्ये भारताने श्रीलंकेलाच हरवून विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर पुन्हा हेच दोन प्रतिस्पर्धी संघ या आव्हानात्मक स्पध्रेत आमनेसामने आहेत.
चॅम्पियन्स करंडकाच्या साखळीमध्ये भारताचा समावेश ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हटल्या जाणाऱ्या ‘ब’ गटात होता. परंतु तरीही तिन्ही सामने जिंकत भारताने बाद फेरीत पोहोचण्याचा पहिला मान मिळवला. तथापि, ऑस्ट्रेलियाच्या झुंजार खेळीला नामोहरम करीत श्रीलंकेने मंगळवारी जेमतेम उपांत्य फेरी गाठली.
ओव्हलवर लंकेने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला आणि चार गुणांनिशी इंग्लंडची बरोबरी केली. परंतु सरस धावगतीच्या आधारे इंग्लिश संघ ‘अ’ गटात अव्वल ठरला, तर श्रीलंकेच्या संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे सोफिया गार्डन्सवर श्रीलंका-भारत हा दुसरा उपांत्य सामना निश्चित झाला.
भारताला नमवून विश्वचषकाच्या पराभवाचे उट्टे फेडण्याचे मनसुबे श्रीलंकेने आखले आहेत. त्या अंतिम सामन्यात भारताने सहा विकेट राखून श्रीलंकेचे २७५ धावांचे अवघड आव्हान सहजगत्या पेलले होते. कप्तान महेंद्रसिंग धोनीने शानदार खेळीप्रमाणेच नुवान कुलसेकराला उत्तुंग षटकार खेचून विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. विश्वचषकामध्ये कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली सामील झालेलाच बहुतांशी श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स करंडकात सहभागी झाला आहे. तथापि, भारतीय संघ आमूलाग्र बदललेला जाणवतो आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये के. श्रीकांत यांची जागा संदीप पाटील यांनी घेतल्यानंतर नव्या दमाचे खेळाडू भारतीय संघात दिसत आहेत. फक्त धोनी, विराट कोहली आणि सुरेश रैना हे तीन विश्वविजेत्या संघातील खेळाडू भारतीय संघात स्थान टिकवून आहेत. रवींद्र जडेजा, शिखर धवन या युवा खेळाडूंमुळे संघाच्या कामगिरीत विशेषत: क्षेत्ररक्षणात फरक जाणवत आहे.
इंग्लिश भूमीवर आल्यानंतर पहिल्या सराव सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केले होते. लंकेचे ३३४ धावांचे डोंगराएवढे आव्हान भारताने पाच विकेट आणि सहा चेंडू राखून आरामात पेलले होते. त्या सामन्यात कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी शतके झळकावली होती. भारताची फलंदाजीची ताकद स्पध्रेत सहजपणे जाणवत आहे. भारताने पाचपैकी (२ सराव आणि ३ साखळी) तीन सामन्यांत तीनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी दोनदा त्यांनी प्रथम फलंदाजी केली होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने २३४ धावांचे आव्हान आठ विकेट राखून आरामात पार केले होते. त्यानंतर एजबॅस्टनला पाऊस आल्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार, पाकिस्तानला चांगल्या फरकाने पराभूत केले.
दुसरीकडे श्रीलंकेचा संघ सामन्यागणिक आपली कामगिरी सुधारत आहे. कार्डिफला पहिलाच कमी धावसंख्येचा रोमहर्षक सामना न्यूझीलंडने एक विकेट राखून जिंकला होता. त्यानंतर ओव्हलवर श्रीलंकेने इंग्लंडचा सात विकेट राखून पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात लंकेने रडत-खडत जिंकण्याची किमया साधत उपांत्य फेरी गाठली.
भारताची फलंदाजीची मदार शिखर धवन, कोहली आणि कार्तिक या युवा खेळाडूंवर आहे, तर श्रीलंकेची मदार जुन्याजाणत्या खेळाडूंवरच अद्याप आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संगकाराने नाबाद १३४ धावांची खेळी साकारत नेमके हेच सिद्ध केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध महेला जयवर्धनेने नाबाद ८४ धावांची कामगिरी करीत ‘जुने तेच सोने’ हेच श्रीलंकेला म्हणायला लावले. संगकारा, जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान ही त्रिमूर्ती आतासुद्धा श्रीलंकेच्या फलंदाजीची शान आहेत. लाहिरू थिरिमाने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज यांसारखे युवा आणि आक्रमक फलंदाज मधल्या फळीत खेळत आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात या दर्जेदार फलंदाजांचा कस लागणार आहे.
२००२ मध्ये कोलंबोत भारत-श्रीलंका यांच्यात चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना होणार होता. परंतु मुसळधार पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही आणि क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयसीसीच्या एखाद्या महत्त्वाच्या स्पध्रेचे जेतेपद विभागून देण्यात आले. परंतु गुरुवारी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही किंवा सराव सामन्याचा निकाल प्रभावी ठरणार नाही. जयवर्धनेच्याच भाषेत सांगायचे तर, ‘‘ही मोठी स्पर्धा आहे आणि गुरुवारी उपांत्य फेरीचा सामना आहे. प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ हेच साधे धोरण आम्ही आखले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार आणि उमेश यादव.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान, लहिरु थिरिमाने, दिनेश चंडिमल, सचित्र सेनानायके, रंगना हेराथ, नुवान कुलसेकरा, शमिंदा इरंगा, लसिथ मलिंगा, दिलहारा लोकुहेटिगे, जीवन मेंडिस, थिसारा परेरा.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : ‘स्टार क्रिकेट’ आणि ‘स्टार स्पोर्ट्स-२’.
साद घालती ‘चॅम्पियन्स’शिखरे!
जगज्जेतेपद, जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केल्यानंतर आता आणखी एक शिखर भारतीय संघाला साद घालते आहे, ते म्हणजे चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद. भारताचा अपराजित आणि आत्मविश्वासपूर्ण प्रवास आता उपांत्य फेरीपर्यंत येऊन ठेपला आहे. आता आव्हान उभे ठाकले आहे ते उपखंडामधीलच आव्हान श्रीलंकेचे. कागदावर भारतीय संघाची ताकद अभेद्य आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc champions trophy stiff lanka challenge awaits unbeaten india