दुबई : चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न करण्याचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी कायम केला. ‘आयसीसी’ने खेळण्याच्या पद्धतीत काही बदल केले असून, ते १ ऑक्टोबरपासून अमलात येतील.

गोलंदाजांकडून नॉन-स्ट्रायकरकडील फलंदाजाला बाद ठरवणारी पद्धत आता धावबाद म्हणून ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत हा निर्णय नियमाच्या अयोग्य खेळ (अनफेअर प्ले) प्रकारात मोडत होता. नियमातील हे दोन्ही बदल यापूर्वीच सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीने प्रस्तावित केले होते. त्यावर ‘आयसीसी’च्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

करोना साथीच्या कालावधीत हे बदल प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम स्वरूपात लागू होतील. याचप्रमाणे खेळ वेगवान करण्यासाठी अन्य बदल प्रस्तावित होते. त्यांनादेखील मान्यता देण्यात आली.

Story img Loader