टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. मात्र गेल्या महिन्यात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर संपूर्ण गणित बदललं आहे. मात्र अफगाणिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये खेळेल, असं आयसीसीचे कार्यवाहक सीईओ ज्योफ अलार्डाइस यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाला तालिबान ध्वजाखाली खेळण्यास सांगितल्यास आयसीसी मनाई करू शकते, असंही सांगण्यात येत आहे.
“आयसीसी टी २० वर्लकपसाठी पात्र ठरलेले सर्वच संघ तयारी करत आहे. त्यांच्या सहभागाची प्रक्रिया सामान्यपणे सुरु आहे.” असं ज्योफ अलार्डाइस यांनी वर्च्युअल बैठकीत सांगितलं. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर क्रिकेटमध्येही बदल करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात हसीद शिनवारीच्या जागेवर नसीब झाद्रान खान यांची क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
“अफगाणिस्तानमध्ये ऑगस्टमध्ये बदल झाल्यापासून आम्ही सतत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात आहोत. सदस्य मंडळाच्या माध्यमातून क्रिकेटला प्रोत्साहन देणं हे आमचं प्राधान्य आहे. ते ही बाब कशी पुढे नेतात याकडे आमचं लक्ष आहे. अफगाणिस्तान आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य आहे. टी -20 विश्वचषकात त्याला गट -2 मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यात भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सारखे संघ देखील आहेत.”, असंही अलार्डाइस यांनी सांगितलं.