क्रिकेटला विविध गैरप्रकारांनी ग्रासले आहे. स्पॉट-फिक्सिंग आणि मॅच-फिक्सिंगसारख्या गंभीर घटनांनी क्रिकेटविश्व ढवळून निघाले आहे. हे सगळे गैरप्रकार उघड होत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचारविरोधी पथकाचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आयसीसीच्या बदलत्या संरचनेप्रमाणे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीची सूत्रे राहणार आहेत. नवी संरचना अस्तित्वात आल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाचा फेरआढावा होणार असल्याचे संकेत मिळाले होते. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी आयसीसीच्या भूमिकेत बदल होणार आहे.
‘‘२००० साली स्थापना झाल्यापासून भ्रष्टाचारविरोधी पथकाने क्रिकेटमधील अनिष्ट गोष्टींना पायबंद घालण्यात महत्त्वाची भूूमिका बजावली आहे. भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचारविरोधी पथकाचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे,’’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले. ‘‘कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असूनही भ्रष्टाचारविरोधी पथकाने अनेक गैरप्रकरणे बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र बदलत्या काळानुसार या पथकाला अधिक सक्षम बनवण्याची गरज असल्याने पथकामध्ये बदल करण्यात येणार आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
श्रीनिवासनविरोधात वर्मा यांचे आयसीसीला आणखी एक पत्र
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निलंबित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे आणखी एक पत्र मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून श्रीनिवासन यांना पायउतार केले आहे, परंतु आयसीसीच्या ९ आणि १० एप्रिलला झालेल्या बैठकीला मात्र त्यांनी हजेरी लावली. वर्मा यांनी कृतीबाबत आक्षेप घेतला असून, तामिळनाडूच्या उद्योगपतीविरोधात आयसीसीने कडक भूमिका घ्यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.