विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.
या सामन्यात शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूत ९ धावांची गरज होती. अशा वेळी बेन स्टोक्सने मारलेला फटका सीमारेषेवर गेला. चेंडू सीमारेषेवर अडवेपर्यंत स्टोक्स दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता. स्टोक्सने दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी झेप घेतली आणि त्याच वेळी सीमारेषेवरून फेकलेला चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. त्या घटनेमुळे इंग्लंडला ४ अतिरिक्त धावा मिळाल्या ज्याचा उपयोग सामना ओव्हरपर्यंत नेण्यात झाला.
पाहा या घटनेचा व्हिडीओ…..
घडलेल्या या प्रकाराबाबत बेन स्टोक्सने सामना संपल्यानंतर भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की आम्हाला आवश्यक ४ धावा मिळाल्या, पण तशा प्रकारे त्या ४ धावा मिळवण्याचा माझा खरंच हेतू नव्हता. चेंडू माझ्या बॅटला लागून सीमारेषेपार गेला. त्यासाठी मी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याची माफी मागितली. मी केनला म्हणालो की या घटनेसाठी मी न्यूझीलंडची आयुष्यभर माफी मागेन.
“I said to Kane I’ll be apologising for that for the rest of my life” – Ben Stokes on those fortunate four runs that turned the game.#SpiritOfCricket | #WeAreEngland pic.twitter.com/b5bAT6p0M6
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.