विश्वचषकाचा आपला पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आता ख्रिस गेलच्या नावे जमा झाला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सचा ३७ षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे.

पाकिस्तान संघाला १०५ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विंडिजच्या संघाने डावाची आक्रमक सुरुवात केली. ख्रिस गेलने दोन षटकार खेचत डिव्हीलियर्सला मागे टाकत आपलं पहिलं स्थान पटकावलं. गेलच्या नावावर आता ४० षटकार जमा आहेत.

त्याआधी आपला पहिला सामना खेळणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला आहे. विंडिजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. विंडिजकडून ओश्ने थॉमसने ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ आणि शेल्डन कोट्रेलने १ बळी घेतला.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कोट्रेलने इमाम उल-हकला माघारी धाडत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळतीच लागली. विंडिजच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत पाक फलंदाजांना नाकीनऊ आणले. फखार झमान आणि बाबर आझमने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

ओश्ने थॉमस आणि आंद्रे रसेल यांनी पाकिस्तानची मधली फळी कापून काढत सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. एका क्षणाला पाकिस्तानचा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या फळीत वहाब रियाझने फटकेबाजी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Story img Loader