इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामन्यात कर्णधार आरोन फिंच याने ठोकलेल्या दमदार शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या वॉर्नर-फिंच जोडीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके केल्यानंतर वॉर्नर बाद झाला, पण कर्णधार फिंचने मात्र शतक ठोकत एक विक्रम केला. पुढील फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने ऑस्ट्रेलियाला तीनशे पार मजल मारता आली नाही.

आरोन फिंचने सामन्यात दमदार शतक ठोकले. त्याने ११६ चेंडूत १०० धावा केल्या. या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. पण धावगती वाढवण्याच्या उद्देशाने त्याने मोठा फटका खेळला. याच वेळी आर्चरच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. पण या शतकी खेळीच्या बळावर त्याने विक्रम केला. फिंचचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील १५ वे शतक ठरले. १५ शतके करण्यासाठी फिंचला ११२ डाव खेळावे लागले. याबरोबरच त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, इंग्लंडचा जो रूट आणि पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर याचा विक्रम मोडला. या यादीत हाशिम आमला अव्वल (८६ डाव) आहे. तर विराट कोहली (१०६ डाव) दुसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करत भक्कम सलामी दिली. १२३ धावांच्या सलामी भागीदारीनंतर वॉर्नर बाद झाला. त्याने ६१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याच्यानंतर फिंचने ख्वाजाच्या साथीने डाव पुढे नेला, पण ख्वाजा २३ धावा करून माघारी परतला. स्टोक्सने त्याच्या त्रिफळा उडवला. फिंचने मात्र दमदार शतक ठोकले. त्याने ११६ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी सजवली. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला.

स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली. पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणी साथ देऊ शकले नाही. धोकादायक मॅक्सवेल १२ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टॉयनीसदेखील धावचीत होऊन माघारी परतला. अखेर शेवटच्या टप्प्यात स्मिथ फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने ३८ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडकडून वोक्सने २ तर आर्चर, वुड, स्टोक्स आणि अली यांनी १-१ बळी टिपला.