विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेता ठरवणाऱ्या सर्वाधिक सीमापार (चौकार आणि षटकार) फटक्यांच्या वादग्रस्त नियमाविषयी अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) क्रिकेट समिती पुनरावलोकन करणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक जेफ अलार्डाइस यांनी रविवारी दिली.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘सुपर ओव्हर’मध्येही सामना बरोबरीत सुटल्यानंतर सर्वाधिक सीमापार फटक्यांच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडवर सरशी साधून विश्वविजेतेपद मिळवले; परंतु या निर्णयावर जगभरातून टीका करण्यात येत आहे. ‘‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सीमापार फटक्यांच्या निर्णयाविषयी क्रिकेट समिती पुढील बैठकीत चर्चा करणार असून यामध्ये अन्य नियमांचेही पुनरावलोकन केले जाईल,’’ असे जेफ म्हणाले. २००९ पासून सामना ‘टाय’ झाल्यास ‘बॉल-आऊट’ पद्धत बंद करून ‘सुपर ओव्हर’द्वारे निकाल लावण्याच्या नियमाचा अवलंब करण्यात आला.
‘‘सामना ‘सुपर ओव्हर’मध्येही ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना विभागून विश्वविजेतेपद देण्याविषयी ‘आयसीसी’ने काहीही निर्णय घेतलेला नसून याविषयी अद्याप एकदाही चर्चा झालेली नाही,’’ असेही ५२ वर्षीय जेफ यांनी सांगितले. तूर्तास, ‘आयसीसी’ १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेकडे अधिक लक्ष देत असून भारतीय कर्णधार विराट कोहलीने या स्पर्धेचे स्वागत केल्यामुळे ‘आयसीसी’ भविष्यात अधिक नवीन उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक आहे, असेही जेफ यांनी सांगितले.