भारताचा सलामीवीर शिखर धवनला अखेर सूर सापडला आहे. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरने शतक झळकावत दमदार पुनरागमन केलं आहे. रोहित शर्माच्या साथीने शिखर धवनने भारतीय संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली. रोहित शर्मा अर्धशतक झळकावून माघारी परतल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत आपलं शतक झळकावलं. या खेळीदरम्यान शिखरने एका विक्रमाची नोंद केली आहे.
ICC Tournament मध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. शिखरचं २० डावांमधलं हे सहावं शतक ठरलं. शिखरने रिकी पाँटींग आणि कुमार संगकाराचा विक्रम या खेळीदरम्यान आपल्या नावे जमा केला. संगकाराने ५६ तर रिकी पाँटींगने ६० धावांमध्ये ६ शतकं झळकावली होती. या यादीमध्ये आता सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज शिखर धवनच्या पुढे आहेत.
Most centuries in ICC ODI tournaments:
7 Ganguly (32 inns)
7 Tendulkar (58)
6 DHAWAN (20)
6 Sangakkara (56)
6 Ponting (60)#INDvAUS #CWC19— Bharath Seervi (@SeerviBharath) June 9, 2019
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात शिखरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. मात्र दुसऱ्याच सामन्यात दमदार पुनरागमन करत शिखरने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये शिखरचा फॉर्म असाच टिकून राहतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.