भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने २०१९ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात अनोखा विक्रम करत, मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. आफ्रिकेने दिलेल्या २२८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात थोडीशी अडखळती झाली. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली ठराविक अंतराने माघारी परतले. मात्र रोहित शर्माने एका बाजूने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला.

रोहितने तिसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसोबत महत्वाची भागीदारी रचत भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. यादरम्यान रोहितने आपलं अर्धशतकही साजरं केलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी रोहित शर्माच्या खात्यात ११ हजार ९२६ धावा जमा होत्या. १२ हजार धावा पूर्ण करण्यासाठी रोहितचा ७४ धावांची गरज होती. त्या धावा करत रोहितने हा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित नववा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनिल गावसकर यांनी हा पल्ला गाठला आहे. आता या यादीमध्ये रोहितचं नाव जोडलं गेलं आहे.

अवश्य वाचा – Video : जेव्हा रबाडाच्या गोलंदाजीवर भारताच्या ‘गब्बर’ची बॅट तुटते…

याआधी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर, पहिला विश्वचषक सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखलं आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २२८ धावांची आवश्यकता आहे. सलामीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आफ्रिकन संघाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं. आफ्रिकेकडून मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने आश्वासक फलंदाजी केली.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना माघारी धाडत आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चहलने डसन आणि डु प्लेसिस यांना ठराविक अंतराने माघारी धाडत भारताचं पारडं पुन्हा एकदा जड केलं.

अवश्य वाचा – Video : जेव्हा चहल आफ्रिकेच्या फलंदाजाला मामा बनवतो

मधल्या फळीत भरवशाच्या जे.पी.ड्युमिनीलाही फारशी चमक दाखवता आली नाही. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – आम्ही सारखी सारखी दया दाखवत नाही, क्विंटन डी-कॉक बाद झाल्यानंतर सेहवागचं खोचक ट्विट

Story img Loader