विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज सुरुवात केली. नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने ढगाळ हवामानाचा फायदा घेत चेंडू स्विंग करायला सुरुवात केली. जसप्रीतच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडालेली पहायला मिळाली.

बुमराहने सर्वप्रथम हाशिम आमलाला माघारी धाडलं. यानंतर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकलाही कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत दुसरा बळी घेतला. डी-कॉकला माघारी धाडल्यानंतर सेहवागने, आयपीएलच्या बाराव्या हंगामातील अंतिम सामन्यातला एक फोटो शेअर करत डी-कॉकला ट्रोल केलं आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात १९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डी-कॉकने चेंडू सोडत चेन्नईला ५ धावा बहाल केल्या होत्या. अटीतटीच्या सामन्यात डी-कॉकने ५ धावा बहाल केल्यामुळे सर्वच जण संतापले होते. मात्र या परिस्थिततही जसप्रीतने डी-कॉकला धीर देत त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला शांत केलं. तोच डी-कॉक भारताविरुद्ध सामन्यात बुमराहचा बळी ठरला आहे.

Story img Loader