विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभव स्विकारण्याची परंपरा पाकिस्तान संघाने कायम राखली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. ३३७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ३५ व्या षटकानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान बराच वेळ वाया गेल्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारित लक्ष्य देण्यात आलं. त्यानुसार पाकिस्तानला ५ षटकात १३६ धावा करमं भाग होतं. हे आव्हान पाकिस्तानी संघाला पेलवलं नाही.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळती झाली. इमाम उल-हक विजय शंकरच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर सलामीवीर फखार झमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. फखार झमानने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस कुलदीप यादवने बाबर आझमनचा त्रिफळा उडवत पाकिस्तानची जोडी फोडली. केवळ दोन धावांनी बाबर आझमचं अर्धशतक हुकलं.
यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळतीच लागली. फखार झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक हे मातब्बर फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. मधल्या फळीत कर्णधार सरफराज आणि इमाद वासिम यांनी थोडीफार झुंज दिली. मात्र वरुणराजाने पाकिस्तानसमोरचं लक्ष्य आणखीन कठीण करुन ठेवलं. विजय शंकरने सरफराजचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला बॅकफूटला ढकललं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं लक्ष्य पाकिस्तानचा संघ पूर्ण करु शकला नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर हा सातवा विजय ठरला आहे.
दरम्यान,सलामीवीर रोहित शर्माचं शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्रिशतकी मजल मारली. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३३६ धावांचं लक्ष्य गाठलं. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल दिसले.
अवश्य वाचा – Ind vs Pak : विराटला मागे टाकत रोहित शर्माची बाजी, केली अनोख्या विक्रमाची नोंद
नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. वहाब रियाझने लोकेश राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.
अवश्य वाचा – Ind vs Pak : रोहित शर्मा चमकला, सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान
दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली. अखेरीस रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत विराट भारताच्या धावसंख्यात भर घातली. पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस धोनीने विजय शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट कोहलीही ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पाऊसाचा व्यत्यय थांबल्यानंतर आमिरने त्याची विकेट घेतली.
यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
अवश्य वाचा – Ind vs Pak : भारताच्या अडचणींमध्ये भर, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मैदानाबाहेर
५ षटकात १३६ धावा करण्याचं आव्हान पाकिस्तानला झेपलं नाही. विश्वचषक स्पर्धेतला भारताचा पाकिस्तानवर हा सातवा विजय ठरला आहे
डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर सुधारीत लक्ष्य ठेवण्यात आलंय.
डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानने ३५ षटकानंतर अपेक्षित धावसंख्येच्या ८६ धावा मागे आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारताचा विजय सुनिश्चीत
सरफराज अहमद त्रिफळाचीत, पाकिस्तानला सहावा धक्का
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर बॅटची कडा लागून शोएब बाद, पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात मोहम्मद हाफीज बाद
कुलदीपने उडवला बाबर आझमचा त्रिफळा.
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर स्विप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चहलने घेतला झमानचा झेल
भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत फखार झमानने अर्धशतकी खेळीची नोंद केली आहे.
भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीदरम्यान दुखापत झाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला, त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी घेतला.
इमाम उल-हक शंकरच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी
केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा पल्ला गाठून दिला.
मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सरफराज अहमदने घेतला झेल
भारताने ओलांडला ३०० धावांचा टप्पा, भारत ४६.४ षटकात ३०५/४
मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सरफराजकडे झेल देत धोनी माघारी. केली अवघी एक धाव
मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या झेलबाद, भारताचा तिसरा गडी तंबूत परतला
रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या मदतीने संघाचा डाव सावरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
हसन अलीच्या गोलंदाजीवर चोरटा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा सोपा झेल देऊन माघारी परतला. रोहितने ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
हसन अलीने रोहित शर्माचा बळी घेतला.
लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने विराटच्या साथीने संघाचा डाव सावरत झळकावलं शतक. या स्पर्धेतलं रोहित शर्माचं हे दुसरं शतक ठरलं आहे.
अखेर वहाब रियाझने भारताची जमलेली जोडी फोडली आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल झेलबाद, पहिल्या विकेटसाठी लोकेश राहुल-रोहित शर्मामध्ये १३६ धावांची भागीदारी
भारतीय फलंदाजांची सामन्यावर मजबूत पकड. पाकिस्तानच्या गोलंदाजांवर राहुलचा हल्लाबोल
रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. शादाब खानच्या एका षटकात १७ धावांची वसुली करत रोहित शर्माचं अर्धशतक साजरं
लोकेश राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सावधपणे सुरुवात करत सामन्यावर आपली पकड बसवली आहे. मोहम्मद आमिरची पहिली काही षटकं सांभाळून खेळल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी पाकच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी यशस्वी अर्धशतकी भागीदारी.
भारतीय संघात विजय शंकरला स्थान, लोकेश राहुल सलामीला येणार