२०१९ विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली. या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्ह्जवरुन सध्या वादाला तोंड फुटलं आहे. धोनीच्या ग्लोव्ह्जवर पॅरा कमांडो दलाचं ‘बलिदान चिन्ह’ नोंदवलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतामध्ये अनेकांनी धोनीचं कौतुक केलं. मात्र यानंतर ICC ने BCCI ला धोनीला बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरण्यास मनाई केली. बीसीसीआयने या प्रकरणी धोनीच्या पाठीमागे ठामपणे उभ राहतं, आयसीसीकडे धोनीला बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरण्याची परवानगी मागितली आहे.

आता या वादामध्ये पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी उडी मारत धोनी आणि भारतीय प्रसारमाध्यमांना टोमणा लगावला आहे. धोनी हा इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेला आहे महाभारतासाठी नाही ! भारतीय प्रसारमाध्यमांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये एवढा रस का आहे?…अशा आशयाचं ट्विट करत फवाद चौधरी यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना झापलं आहे.

त्यांच्या या ट्विटवर काही भारतीय चाहत्यांनी फवाद चौधरींना धोनीची बाजू घेत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

यावर प्रत्युत्तर देताना चौधरी यांनी पुन्हा एकदा, क्रिकेटला Gentelman’s Game राहू द्या, त्याला भारतीय राजकारणाचा फड बनवण्याची गरज नाही असा सल्ला दिला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने धोनीला बलिदान चिन्ह असल्याचं ग्वोव्ह्ज वापरण्याची परवानगी दिली आहे, मात्र यासाठी त्याला कोणताही धार्मिक, राजकीय संदेश न देण्याची अट घातली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader