सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केली. आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं २२८ धावांचं आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहितने १४४ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. रोहितच्या या खेळीमुळे भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत चांगलेच प्रभावित झाले आहेत.
“दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात रोहितला फार वेगळं काही करण्याची गरज नव्हती. मात्र या खेळीमुळे रोहित शर्माला आत्मविश्वास मिळेल. रोहित सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. रोहितसारखा गुणवान खेळाडू संघात असणं ही भारतासाठी सकारात्मक गोष्ट आहे. त्याचा हा फॉर्म कायम राहिल्यास कर्णधार विराट कोहलीवरचा दबाव कमी होऊ शकतो.” श्रीकांत एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने नुकतच आयपीएलच्या बाराव्या हंगामाचं विजेतेपदही पटकावलं होतं. आपला हाच फॉर्म कायम राखत रोहितने पहिल्या सामन्यात शतक झळकावलं. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना ९ जूनरोजी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : धोनी कॉम्प्युटरपेक्षाही वेगवान – शोएब अख्तर