भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांच्या साथीने तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत आहे. अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून बुमराहच्या यॉर्करची ओळख आहे. याच यॉर्करबद्दल जसप्रित बुमराहने काही रंजक किस्से सांगितले आहेत.
“मी लहानपणी अंगणात खेळायचो, तेव्हा मी कायम यॉर्क चेंडू टाकायचो. मला फारसे समजत नसतानाही मी यॉर्कर चंदू टाकण्याचाच सराव करत असायचो. याचे कारण म्हणजे टीव्हीवर मी जेव्हा क्रिकेटचे सामने पाहायचो तेव्हा त्यात एक गोष्ट मला जाणवायची ती म्हणजे गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला की फलंदाज निरुत्तर होतो आणि गोलंदाजाला यश मिळते. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो. तेव्हापासून मी यॉर्कर चेंडूचा सराव करतो आहे. म्हणूनच माझं यॉर्कर चेंडूवर अतिशय प्रेम आहे”, असे बुमराहने सांगितले. BCCI ने बुमराहची एक छोटीशी मुलाखत ट्विट केली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
FEATURE: @Jaspritbumrah93 on his love for yorkers, his biggest life support & #TeamIndia‘s #CWC19 campaign so far on the eve of the India-West Indies clash
Watch the full video! Click here https://t.co/ml8KpCPcyW pic.twitter.com/YE43UUDTOG
— BCCI (@BCCI) June 26, 2019
माझी आई हीच माझे प्रेरणास्थान!
“मी अगदी लहान असताना माझे वडील देवाघरी गेले. मी, माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघेच होतो. मी मोठा होताना मी माझ्या आईकडे पाहायचो. वडील नसल्याने तिनेच आम्हाला दोघांना लहानाचे मोठे केले. ती शाळेत मुख्याध्यापक होती आणि ती नुकतीच निवृत्त झाली. पण तिने प्रतिकूल परिस्थिती ज्या प्रकारे आमचे पालन पोषण केले, ते पाहून मला प्रेरणा मिळाली. माझी आई हीच माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा तुमच्या घरातच एवढा मोठा प्रेरणेचा स्रोत असतो, तेव्हा तुम्हाला बाहेरून कोणाकडून प्रेरणा घेण्याची गरज भासत नाही. तिने ज्या पद्धतीने कठीण प्रसंगांवर मात केली आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या,मी तशाच पद्धतीने मी संघाच्या कठीण प्रसांगात माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो,” असेही बुमराहने स्पष्ट केले.