ज्ञानेश भुरे, लोकसत्ता
पुणे : एक आव्हान संपलेला, तर दुसरा उपांत्य फेरी गाठलेला अशा दोन परस्परविरोधी कामगिरी केलेल्या बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघात आज, शनिवारी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर सामना होणार आहे. फलंदाजीला अनुकूल, पण फिरकीलाही मदत करणाऱ्या येथील खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य उपांत्य फेरीसाठी सराव करून घेण्याचे राहील. दुसरीकडे बांगलादेश संघाचे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पात्रतेचे लक्ष्य असून ते विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
हेही वाचा >>> SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून विजय, रॅसी व्हॅन डर डुसेनने झळकावले नाबाद अर्धशतक
बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांनी हे मान्य केले. हथुरुसिंघे म्हणाले की, ‘‘स्पर्धेत एकूणच आमची कामगिरी निराशाजनक झाली आहे. कुणाकडे बोट दाखवणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक आघाडीवर आम्हाला अपयश आले आहे. त्यामुळे आमच्या हातात प्रयत्न करणे इतकेच असून, विश्वचषक स्पर्धेत गेलेली प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’’ विश्वचषक स्पर्धेतील आव्हानाचा प्रश्न नसला, तरी हा सामना दोन मोठय़ा पार्श्वभूमीवर होत आहे. आधीच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या जिगरबाज खेळीने ऑस्ट्रेलियाने हरलेला सामना जिंकताना उपांत्य फेरी गाठली होती. त्याच वेळी दुसरीकडे बांगलादेश संघ श्रीलंकेवर विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वासाने उतरेल. आता बांगलादेश संघ ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत स्पर्धेची सांगता करण्याचा प्रयत्न करेल.