संदीप कदम
मुंबई : आपल्या गेल्या सामन्यांत तुलनेने दुबळय़ा संघांविरुद्ध पराभूत झालेल्या इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या संघांचे विजयी पुनरागमनाचे ध्येय असून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हे संघ शनिवारी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. गेल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तान, तर दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सने पराभवाचा धक्का दिला होता.
टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेने स्पर्धेला चांगली सुरुवात केली होती. मात्र, नेदरलँड्सविरुद्ध त्यांची फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडविरुद्ध त्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा असेल. गेला सामना सोडल्यास दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची शीर्ष फळी चांगल्या लयीत आहे. सलामीवीर क्विंटन डिकॉक, रासी व्हॅन डर डसन, एडीन मार्करम यांनी शतके साकारली आहेत. वानखेडे स्टेडियमची सीमारेषा जवळ असल्याने याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. नेदरलँड्सविरुद्ध संघाला सातत्याने गडी गमावल्याचा फटका बसला. ही चूक त्यांनी सुधारणे गरजेचे आहे. आफ्रिकेची वानखेडेवरील कामगिरी यापूर्वी चांगली झाली आहे, जी संघासाठी सकारात्मक बाब आहे.
हेही वाचा >>> AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय! ॲडम झाम्पाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा ६२ धावांनी उडवला धुव्वा
दुसरीकडे, गतविजेता इंग्लंडचा संघ आफ्रिकेविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असेल. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांना यासाठी कामगिरीत सातत्य आणावे लागेल. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, कर्णधार जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी आक्रमक खेळ करताना सातत्य राखणेही आवश्यक आहे. संघाकडे लिआम लिव्हिंगस्टोन, सॅम करन व मोईन अली यांसारखे कौशल्यपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहेत. याचा फायदा संघाला होऊ शकतो.
इंग्लंड
* या सामन्यात बेन स्टोक्सचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे स्टोक्सला विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांना मुकावे लागले; परंतु त्याने शनिवारी वानखेडेवर कसून सराव केला. त्यामुळे तो आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची दाट शक्यता आहे.
* इंग्लंडला चांगली सुरुवात करायची झाल्यास जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान या फलंदाजांनी चमक दाखवणे गरजेचे आहे. मध्यक्रमाची जबाबदारी अनुभवी जो रूट, कर्णधार जो बटलर व बेन स्टोक्स यांच्यावर असेल.
* मोईन अली, लिआम लिव्हिंगस्टोन व आदिल रशीद यांच्यावर संघाच्या फिरकीची मदार असेल. वानखेडेच्या खेळपट्टीवर त्यांची भूमिका महत्त्वाची राहील. मार्क वूड, रीस टॉपली या वेगवान गोलंदाजांवर डावाच्या सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकण्याची जबाबदारी असेल.
दक्षिण आफ्रिका
* आफ्रिकेच्या संघाला आक्रमक सुरुवात देण्याची जबाबदारी ही क्विंटन डिकॉक आणि कर्णधार टेम्बा बव्हुमा यांच्यावर असेल. मध्यक्रमात रासी व्हॅन डर डसन, एडीन मार्करम, हेन्रिक क्लासन व डेव्हिड मिलर यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहील.
* केशव महाराज, मार्को यान्सन या खेळाडूंनी गेल्या काही सामन्यांत गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर चमक दाखवली आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांची भूमिका निर्णायक असेल. महाराजला मार्करम फिरकीला साथ देऊ शकतो. शम्सीला संधी मिळाल्यास तोदेखील संघासाठी उपयुक्त असेल.
* लुन्गी एन्गिडी व अनुभवी कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांकडून संघाला खूप अपेक्षा असतील. तसेच, युवा मार्को यान्सनची त्यांना साथ मिळेल.
* वेळ : दु. २. वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार
अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवाला आम्ही मागे सोडले आहे. आगामी सामन्यांबाबत संघात चांगली चर्चाही झाली. सरावातही खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळाला. संघनिवड करताना आमच्याकडे चांगले पर्याय आहेत. त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना आम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतील. बेन स्टोक्सने चांगला सराव केला. स्टोक्सच्या उपस्थितीमुळे संघासाठी चांगले पर्याय उपलब्ध होतात. तसेच तो मैदानात असल्यास कर्णधार म्हणून मलाही मदत होते.- जोस बटलर, इंग्लंडचा कर्णधार
सामन्याला हवामानाचा फटका?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ आल्यास, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक सामन्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.