मुंबई : साखळी फेरीत वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ आणि महत्त्वाच्या क्षणी आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा न्यूझीलंड संघ यांच्यात उद्या, बुधवारी उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे  स्टेडियमवर होणऱ्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांत दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा भरणा असून फलंदाजांचा कस लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वानखेडेवर आव्हानाचा पाठलाग करताना संघांना अडचण येत असल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारणे शक्य होते. परंतु प्रकाशझोतात सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळले. याच मैदानावर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यांसमोर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली होती. श्रीलंकेचा संघ ५५ धावांत गारद झाला होता. त्यानंतरच्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची ७ बाद ९१ अशी स्थिती केली होती. मात्र, ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता. परंतु अशी खेळी वारंवार पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे वानखेडेवर नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याला कर्णधार पसंती देतात. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक जिंकेल, अशी भारतीय चाहत्यांना  आशा असेल.

हेही वाचा >>> वानखेडेवर भारताविरुद्ध खेळण्याचे स्वप्न – रचिन

वानखेडेच्या खेळपट्टीवर नेहमीच चांगली उसळी असते. त्यातच भारतीय संघात जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि सिराज यांसारखे, तर न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, लॉकी फग्र्युसन आणि टीम साऊदी यांसारख वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जाणार नाही. भारतीय संघातील सर्वच फलंदाज सध्या जोरात आहेत.

कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी एक, तर विराट कोहलीने दोन शतके साकारली आहेत. शुभमन गिलला मोठी खेळी करता आलेली नसली, तरी तो सातत्याने धावा करत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी डावखुऱ्या रचिन रवींद्रने अप्रतिम फलंदाजी केली आहे.

तसेच न्यूझीलंडकडे कर्णधार केन विल्यम्सन, डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरेल मिचेल यांसारखे फलंदाज आहेत. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखा असेल.

भारतीय संघावर दडपण — टेलर

मायदेशात विश्वचषक स्पर्धा होत असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यातच भारतीय संघाने साखळी फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. न्यूझीलंडला हरवणे सोपे जाणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताने याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघावर दडपण असेल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने व्यक्त केले. तसेच नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. न्यूझीलंडला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली सुरुवात मिळाल्यास त्यांना रोखणे अवघड जाईल. भारताविरुद्ध जिंकायचे झाल्यास पहिल्या दहा षटकांत त्यांचे दोन—तीन गडी बाद करणे आवश्यक आहे, असेही टेलर म्हणाला.