बंगळूरु : प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या न्यूझीलंडच्या संघाचा आज, शनिवारी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानशी सामना होणार आहे. उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात हार पत्करावी लागल्यास पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडच्या संघाने यंदाच्या स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पहिले चारही सामने जिंकले होते. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, त्यानंतरच्या तीन सामन्यांत न्यूझीलंडला अनुक्रमे भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्धचा सामना न्यूझीलंडसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास न्यूझीलंडची उपांत्य फेरीसाठी दावेदारी भक्कम होईल, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाद होईल.

हेही वाचा >>> Cricket World Cup 2023 : विश्वचषकात ‘अ‍ॅशेस’ लढत; ऑस्ट्रेलियाच्या मार्गात आज इंग्लंडचा अडथळा

यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने येथील वातावरण आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेणे पाकिस्तानला अवघड जाणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र, पाकिस्तानच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पाकिस्तानला सातपैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या आशा राखण्यासाठी पाकिस्तानला आपले उर्वरित दोन सामने जिंकतानाच अन्य संघांच्या निकालांवरही लक्ष ठेवावे लागेल.

पाकिस्तान

’पाकिस्तानच्या संघाने गेल्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता. त्या वेळी फखर झमान आणि अब्दुल्ला शफिक यांनी अर्धशतकी योगदान दिले होते. ते न्यूझीलंडविरुद्धही दमदार कामगिरी करतील अशी पाकिस्तानला आशा असेल.

’कर्णधार बाबर आझमला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याने सातपैकी तीन सामन्यांत अर्धशतके केली आहेत. मात्र, अन्य चार सामन्यांत तो सपशेल अपयशी ठरला आहे. त्याने, तसेच मोहम्मद रिझवानने लौकिकाला साजेशी कामगिरी करणे गरजेचे आहे.

’गोलंदाजीत शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम यांनी गेल्या सामन्यात भेदक मारा केला होता. त्यांना हॅरिस रौफने मोलाची साथ दिली होती. या तिघांपासून न्यूझीलंडला सावध राहावे लागेल.

हेही वाचा >>> NED vs AFG, World Cup 2023: अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, गुणतालिकेत पाकिस्तानला टाकले मागे

न्यूझीलंड

’न्यूझीलंडच्या खेळाडूंचा दुखापतींनी पिच्छा पुरवला आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री स्पर्धेबाहेर गेला असून काएल जेमिसनला संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच कर्णधार केन विल्यम्सन, मार्क चॅपमन, जिमी नीशम आणि लॉकी फग्र्युसन हे खेळाडूही जायबंदी आहेत. परंतु नीशम सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

’न्यूझीलंडसाठी फलंदाजीत रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी चमक दाखवली असून गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर प्रभावी ठरले आहेत. त्यांच्यावरच न्यूझीलंडची भिस्त असेल.

’ विल्यम्सनच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळणारा टॉम लॅथम, डेव्हॉन कॉन्वे आणि विल यंग यांनी अधिक मोठे योगदान देणे गरजेचे आहे. गोलंदाजीत टीम साऊदीचा अनुभवही न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा ठरू शकेल.

’ वेळ : सकाळी १०.३० वा.  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी

(संबंधित एचडी वाहिन्यांवर), हॉटस्टार अ‍ॅप        

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2023 match preview pakistan vs new zealand zws
Show comments