कोलकाता : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध २८७ धावांनी किंवा २८४ चेंडू राखून विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानसाठी हे निश्चितच मोठे आव्हान ठरणार आहे.
साखळी फेरीतील एक सामना शिल्लक असताना गुणतालिकेत चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस होती. यापैकी न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेवर सहज विजय मिळवताना उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. या निकालानंतर अफगाणिस्तानपुढे दक्षिण आफ्रिकेला तब्बल ४३८ धावांनी पराभूत करण्याचे अशक्यप्राय आव्हान होते. मात्र, अफगाणिस्तानला यात यश आले नाही. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी आता केवळ न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. या स्पर्धेतही न्यूझीलंडचा संघ सध्या बराच पुढे आहे.
हेही वाचा >>> ICC Cricket World Cup 2023 : सराव हेच ऑस्ट्रेलियाचे उद्दिष्ट; पुण्यात आज बांगलादेशशी लढत
न्यूझीलंडचे नऊ सामन्यांअंती १० गुण असून पाकिस्तानचे आठ सामन्यांत आठ गुण आहेत. त्यामुळे पाकिस्तानला विजय अनिवार्य आहे. शिवाय न्यूझीलंडची निव्वळ धावगती +०.७४३ अशी, तर पाकिस्तानची +०.०३६ अशी आहेत. आता न्यूझीलंडला मागे टाकायचे झाल्यास पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडवर २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल. परंतु इंग्लंडची प्रथम फलंदाजी आल्यास, त्यांनी दिलेले आव्हान पाकिस्तानला केवळ १६ चेंडूंत पार करावे लागले. त्यामुळे सध्या तरी न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठणार असे चित्र आहे. गतविजेत्या इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले असले, तरी सातवे स्थान मिळवत २०२५च्या चॅम्पियन्स करंडकासाठी पात्रता मिळवण्याची त्यांना संधी आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. पाकिस्तानला विजय मिळवणे सोपे जाणार नाही.