कला, तंत्रज्ञानाच्या आविष्कारासह रंग, उत्साहाची उधळण आणि ओश्ॉनिया प्रांताच्या संस्कृतीची झलक देत २०१५च्या क्रिकेट विश्वचषकाची दिमाखदार सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे झालेल्या रंगारंग सोहळ्यात क्रिकेट परंपरेला जागत सादर झालेल्या सांस्कृतिक सोहळ्याने दीड महिन्याच्या क्रिकेट मैफलीची नांदी झाली.
यजमान न्यूझीलंड संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने यावेळी देशवासीयांना संबोधित केले. यानंतर प्रसिद्ध संगीतकार सोल थ्री मियोच्या सादरीकरणाने चाहत्यांची मने जिंकली. क्रिकेटची ओळख करून देण्यासाठी लहानग्या कलाकारांसमेवत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग सहभागी झाला होता. फ्लेमिंगने आपल्याकडे फलंदाजीबरोबर अभिनयाचेही नैपुण्य असल्याचे सिद्ध केले.
चार महिन्यांपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने मेलबर्न नगरीत ‘धतिंग नाच’ या देशी गाण्याच्या तालावर थिरकवले. ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटात शाहीद कपूरवर चित्रित या गाण्यावर कलाकारांनी भन्नाट नृत्य सादर केले आणि जल्लोषाला उधाण आले. यानंतर इंग्लंडच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला. सिडनी मेइर म्युझिक बाऊल या ठिकाणी रंगलेल्या सोहळ्यात जेसिका मौबॉयसह अन्य कलाकारांनी आपल्या अदाकारीने उपस्थितांना खूश केले. यानंतर विश्वचषकाचे बोधचिन्ह रोबोच्या रूपात अवतरले. भव्य आकाराच्या या रोबोने १९७५ ते २०१५च्या विश्वचषकाचा प्रवास आपल्या हालचालीतून उलगडला आणि उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
२३ वर्षांपूर्वी याच भूमीत झालेल्या विश्वचषकाने रंगीत क्रिकेटची पर्वणी मिळाली होती. तीन वर्षांपूर्वी निसर्गाच्या भूकंपरूपी प्रकोपात न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च मैदानाची वाताहत झाली होती. मात्र अपघाताने खचून न जाता जिद्दीने उभे राहत हेगले ओव्हल या नव्या मैदानाची निर्मित्ती करण्यात आली. भूकंपाचे व्रण अजूनही शहरात जागोजागी दिसत असले, तरी विश्वचषकाच्या निमित्ताने शहर क्रिकेटमय झाले आहे. हेगले ओव्हलच्या प्रांगणातच रंगलेल्या उद्घाटन सोहळ्यात महापौर लिआन डालझिअल यांनी ‘आम्ही परतलो आहोत’ अशा शब्दांत उपस्थितांचे स्वागत केले. ‘‘भूकंपाचे दु:ख विसरून नव्याने उभे राहिलेल्या ख्राइस्टचर्च शहरात विश्वचषकाचा रंगारंग सोहळा व्हावा, हे औचित्य साजेसे आहे,’’ असे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी सांगितले. की यांनीच विश्वचषकाचे औपचारिक उद्घाटन केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी विश्वचषक करंडकाचे अनावरण केले. सर्वोत्तमाचा ध्यास, निष्ठा आणि सर्वसमावेशकता या मूल्यांचे विश्वचषक प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला सहभागी देशांचे कर्णधार उपस्थित होते.
क्षणचित्रे..
*विश्वचषकाच्या निमित्ताने मेलबर्न नगरीत ‘धतिंग नाच’
*देशी गाण्याच्या तालावर झालेल्या नृत्यामुळे भारतीय खेळाडूंचा मानसिक थकवा दूर
*‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटात शाहीद कपूरवर चित्रित या गाण्यावर कलाकारांकडून भन्नाट नृत्य सादर
*इंग्लंडच्या कलाकारांकडूनही नृत्याविष्कार सादर
*बोधचिन्हाच्या भव्य आकाराच्या रोबोने १९७५ ते २०१५च्या विश्वचषकाचा प्रवास उलगडला
खेल शुरु किया जाए!
कला, तंत्रज्ञानाच्या आविष्कारासह रंग, उत्साहाची उधळण आणि ओश्ॉनिया प्रांताच्या संस्कृतीची झलक देत २०१५च्या क्रिकेट विश्वचषकाची दिमाखदार सुरुवात झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-02-2015 at 04:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup is officially underway