ICC fines Shubman Gill Per cent of match fee: डब्ल्यूटीसी फायनल सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर शुबमन गिलला बाद देण्यावरुन वाद झाला होता. आता या सामन्यानंतर शुबमन गिलवर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. त्याच्यावर मॅच फिच्या १५ टक्के दंड ठोठावला.
भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना गिल स्लिपमध्ये झेलबाद झाला होता. त्याचा झेल ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनने घेतला. गिलचा झेल घेताना चेंडू जमिनीवर टेकला असल्याचा दिसत होता. मात्र, थर्ड अंपायरने गिलला बाद घोषित केले. यानंतर भारतीय फलंदाजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या विकेटवर प्रतिक्रिया दिली. आता ही प्रतिक्रिया देणे गिलला महागात पडले आहे.
या कृतीसाठी आयसीसीने गिलला त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. ही घटना सामन्याच्या चौथ्या दिवशी घडली, जेव्हा टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजी करत होती. बाद झाल्यानंतर गिलने इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून ग्रीनने घेतलेल्या झेलवर प्रतिक्रिया दिली होती.
आयसीसीकडून सांगण्यात आले की, शुबमन गिलला कसोटीच्या चौथ्या दिवशी बाद दिल्याच्या निर्णयावर टीका केल्यामुळे त्याला दंड सुनावला आहे. शुबमन गिलने कलम २.७ चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीशी संबंधित आहे. यामुळे त्याला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा – WTC Final 2023: पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ठोठावला दंड, काय आहे कारण? जाणून घ्या
भारताचा सलामीवीर शुबमन गिल अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात केवळ १३ धावा करून बाद झाला. रोहित १५ धावा करून आणि पुजारा १४ धावा करून बाद झाला. कोहलीही १४ धावा करून बाद झाला. श्रीकर भरतने ३१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात गिल १८ धावा करून बाद झाला. पुजारा २७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचे बाद होणे वादग्रस्त ठरले. त्याच्या पकडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.