ICC Hall of Fame: क्रिकेटच्या इतिहासातील तीन महान खेळाडूंचा समावेश आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, माजी भारतीय महिला कसोटी कर्णधार डायना एडुलजी आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज अरविंदा डी सिल्वा यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी तीन दिग्गजांची नावे आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत नवीन यादी जाहीर केली आहे.
आधुनिक क्रिकेटच्या आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सलामीवीरांमध्ये गणला जाणाऱ्या सेहवागने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आहे. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. सेहवागने कसोटीत दोनदा त्रिशतक ठोकले. आपल्या शानदार कारकिर्दीत त्याने २३ कसोटी शतके झळकावली. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे.
सेहवागची कारकीर्द
सेहवागची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ३१९ धावा आहे. ही कसोटीतील भारतीयांची सर्वोच्च धावसंख्या आहे. सेहवागने २००८ साली चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावा केल्या होत्या. एकूण १०४ कसोटी सामन्यांमध्ये सेहवागच्या नावावर ८५८६ धावा आहेत. त्याने ४९.३४च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सेहवागने २५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.०५च्या सरासरीने ८२७३ धावा केल्या आहेत. २००७ मध्ये टी२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य आहे. २०११च्या विश्वचषकात सेहवागने ३८० धावा केल्या होत्या.
ICC हॉल ऑफ फेममध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश
सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मांकड, डायना एडुलजी, वीरेंद्र सेहवाग.
एडुलजी म्हणाले- भारतीय क्रिकेटसाठी हा अभिमानाचा क्षण आहे
आयसीसी हॉल ऑफ फेममधील दुसरे नाव म्हणजे डायना एडुलजी. त्यांनी जवळपास तीन दशके भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले. डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज म्हणून ५४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १०९ विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत. एडुलजींनी पश्चिम रेल्वेमध्ये प्रशासकाची भूमिका स्वीकारली आणि महिला क्रिकेटपटूंसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. पश्चिम आणि भारतीय रेल्वेचे क्रीडा धोरण तयार करण्यातही त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे.
आयसीसीने केलेल्या या सन्मानानंतर एडुल्जी म्हणाल्या, “सर्वप्रथम मी ‘आयसीसी हॉल ऑफ फेम २०२३’ मध्ये माझी निवड केल्याबद्दल आयसीसी आणि ज्युरींचे आभार मानू इच्छिते. प्रथमच भारतीय महिला क्रिकेटपटूचा समावेश होणे हा खरोखरच माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हा नुसता माझा गौरव नाही तर बीसीसीआय आणि भारतीयांसाठी हा मोठा सन्मान आहे. महिला क्रिकेटसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे.
अरविंद डी सिल्वाच्या नावावर २० कसोटी शतके आहेत
‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये सामील झालेला तिसरा खेळाडू म्हणजे अरविंदा डी सिल्वा, ज्याने १९९६ मध्ये श्रीलंकेला आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकण्यास महत्वाची भूमिका निभावली होती. श्रीलंकेचा हा फलंदाज फलंदाजीतील सातत्यासाठी ओळखला जात असे. १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने २० कसोटी शतके झळकावली. त्याचे फलंदाजीतील नैपुण्य केवळ कसोटी फॉरमॅटपुरते मर्यादित नव्हते. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील ११ शतके ठोकली आहेत. अरविंदा डी सिल्वाने ९३ कसोटी सामन्यात ४२.९७ च्या सरासरीने ६३६१ धावा केल्या आहेत. जर एकदिवसीय बद्दल बोलायचे झाले तर त्याने ३०८ सामन्यात ३४.९०च्या सरासरीने ९२८४ धावा केल्या.