ICC Announced ODI Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२३ चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा कर्णधार पॅट कमिन्सला संघात स्थान मिळालेले नाही. या संघात भारताचे सहा खेळाडू आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडे प्रत्येकी दोन, तर न्यूझीलंडचा एक खेळाडू आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळलेल्या आठ खेळाडूंचा या संघात समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदाचा सामना खेळला गेला होता. या संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांसारख्या मोठ्या संघातील खेळाडू नाहीत.
संघात कोणा-कोणाला मिळाले स्थान –
कर्णधार रोहितशिवाय शुबमन गिलचा सलामीवीर म्हणून या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मधल्या फळीची जबाबदारी विराट कोहलीवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे तीन गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. यामध्ये दोन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूचा समावेश आहे. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या संघात आहेत, तर कुलदीप यादवचाही समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि अॅडम झाम्पा यांचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन संघात यष्टीरक्षक असेल आणि याशिवाय मार्को जॅनसेनचाही समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेललाही स्थान मिळाले आहे.
गेल्या वर्षी रोहित उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याने ५२ च्या सरासरीने १२५५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर शुबमनसाठी विश्वचषक काही खास नसला, तरी गेल्या वर्षी त्याने या फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्ध त्याने १४९ चेंडूत २०८ धावांची खेळी साकारली होती. शुबमनने २०२३ साली वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने १५८४ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार
विराटसाठीही गतवर्ष खूप चांगले होते. एकदिवसीय सामन्यात त्याने १३७७ धावा केल्या आणि शुभमननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी, कोहलीने सहा शतके झळकावली आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विश्वचषकात तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला.
आयसीसीचा सर्वोत्तम वनडे संघ २०२३ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन, अॅडम झाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी