ICC announced the schedule of T20 World Cup 2024 : आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान २० संघांमध्ये होणार आहे. २९ जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर भारत- पाकिस्तान सामना ९ जून रोजी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा तिसरा सामना १२ जूनला अमेरिकेसोबत आणि चौथा सामना १५ जूनला कॅनडाशी होईल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांची प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए सोबत ठेवण्यात आले आहे.

कोणता संघ कोणत्या गटात –

अ गट: भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट: न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

हेही वाचा – ICC Test Rankings : केपटाऊनमधील ऐतिहासिक विजयानंतरही भारताची क्रमवारीत घसरण, ऑस्ट्रेलियाने पटकावले अव्वल स्थान

या तीन टप्प्यात होणार स्पर्धा –

लीग स्टेज: पहिला टप्पा १ ते १८ जून दरम्यान खेळला जाईल. प्रत्येक गटातील संघ आपापसात एक-एक सामना खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील.

सुपर-8: दुसरा टप्पा १९ ते २४ जून दरम्यान खेळवला जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ येथे सहभागी होतील. एकूण आठ संघ प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. येथून अव्वल चार संघ नॉकआऊट (बाद) फेरीत पोहोचतील.

नॉकआऊट: जे संघ सुपर-8 मध्ये चांगली कामगिरी करतील ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य फेरीचा सामना २६ जूनला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना २७ जूनला होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही विजेत्यांमध्ये २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

हेही वाचा – IND vs SA : बुमराह-सिराजने केला मोठा पराक्रम! भारतीय वेगवान गोलंदाजांनी १० वर्षांनंतर विदेशात केली ‘ही’ खास कामगिरी

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचे आयोजन अमेरिकेतील तीन आणि वेस्ट इंडिजमधील सहा मैदानांवर होणार आहे. २० पैकी दहा संघ यूएसमध्ये २९ दिवसांच्या स्पर्धेतील त्यांचे पहिले सामने खेळतील, १६ सामने लॉडरहिल, डॅलस आणि न्यूयॉर्क येथे होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना ९ जून रोजी लॉंग आयलंडमधील न्यू नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

वेस्ट इंडिजमधील सहा वेगवेगळ्या बेटांवर ४१ सामने खेळवले जातील. उपांत्य फेरीचे सामने त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि गयाना येथे खेळवले जातील. त्याचबरोबर अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc has released the t20 world cup 2024 schedule and know when the india vs pakistan match will be played vbm