आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी कोडचा भंग केल्याच्या आरोपाखाली यूएईचे दोन क्रिकेटपटू आठ वर्षांसाठी निलंबित झाले आहेत. मोहम्मद नावेद आणि शायमान अन्वर बट अशी या क्रिकेटपटूंची नावे आहेत. या दोघांवरील बंदी 16 ऑक्टोबर 2019पासून सुरू झाली असल्याचे आयसीसीने सांगितले. 2019च्या टी-20 विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील सामन्यांदरम्यान या दोन्ही क्रिकेटपटूंनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले.

 

https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2021/03/fd131ebf608ae66108038993636e428b.jpg
मोहम्मद नावेद आणि शायमान अन्वर बट

 

सुनावणीनंतर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने या दोन्ही खेळाडूंना दोषी ठरवले आहे. नावेद आणि अन्वर यांच्यावर आयसीसीच्या 2.1.1 आणि 2.4.4 कलमांचा भंग केल्याचा आरोप आहे.

आयसीसीच्या  अलेक्स मार्शल यांचे मत

आयसीसी इंटिग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर अलेक्स मार्शल म्हणाले, “नावेद आणि अन्वर यूएईसाठी क्रिकेट खेळायचे. नावेद संघाचा कर्णधार होता तर अन्वर सलामीवीर होता. दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप मोठी आहे. मॅच फिक्सिंगशी संबध जोडल्यावर काय होते, हे त्यांना ठाऊक आहे. असे असूनही हे दोन्ही खेळाडू भ्रष्टाचारात सामील झाले आणि त्यांनी संघातील सहकारी आणि यूएईच्या समर्थकांची फसवणूक केली.”

मार्शल म्हणाले, “मला आनंद आहे की, न्यायाधिकरणाने त्यांच्यावर क्रिकेटचे सर्व प्रकार खेळण्यास बंदी घातली. चुकीच्या मार्गाने जाण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हा इशारा आहे.”

काही दिवसांपूर्वी लंकेच्या क्रिकेटपटूवर झाली बंदीची कारवाई 

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतिगेला आयसीसीने निलंबित केले. टी-१० लीग दरम्यानच्या भ्रष्टाचाराच्या तीन आरोपांमध्ये लोकुहेतिगे दोषी आढळला. नोव्हेंबर २०१९मध्ये तीन सदस्यीय न्यायाधिकरणाने आरोप लावल्यानंतर लोकुहेतिगेला तिन्ही प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले.

Story img Loader