आता टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने एक चूक केली, तर ती चांगलीच महागात पडणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केला आहे. या अंतर्गत, गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल. जर संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला, तर उर्वरित षटकांमध्ये, त्याचा एक क्षेत्ररक्षक ३० यार्डबाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला आत राहावे लागेल. अशा स्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला तोटा सहन करावा लागू शकतो. सध्या, पॉवरप्लेनंतर ३० मीटर यार्ड वर्तुळाबाहेर ५ क्षेत्ररक्षक असतात. मात्र नवीन नियमांनंतर केवळ ४ क्षेत्ररक्षक यार्डबाहेर राहू शकणार आहेत.
याशिवाय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक डावात अडीच मिनिटांचा ऐच्छिक ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी सहमती दर्शवली तरच हे लागू होईल. टी-२० क्रिकेटमधील बदलांशी संबंधित हे नियम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या एकमेव सामन्यापासून लागू होतील. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १८ जानेवारीपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या महिलांच्या टी-२० मालिकेत नवीन नियम पहिल्यांदाच लागू होणार आहेत.
हेही वाचा – IND vs SA : “आम्ही किमान ६०-७० धावा..”; जोहान्सबर्ग कसोटीतील दारूण पराभवाचे केएल राहुलने सांगितले कारण
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या द हंड्रेड क्रिकेट लीग अर्थात ईसीबीमध्ये असा नियम यशस्वीपणे वापरल्यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सर्व फॉरमॅटमध्ये खेळाचा वेग सुधारण्यासाठी असे करण्यात आले आहे.