What are ICC New Rules : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनंतर, खेळाडू नियमांचा वापर करून अयोग्य फायदा घेऊ शकणार नाहीत. स्टंपिंगबाबत आयसीसीने सर्वात मोठा नियम बदलला आहे. यासंबंधीचे रिव्ह्यू आता फक्त साइड-ऑन कॅमेरे पाहूनच घेतले जातील. याचा अर्थ स्टंपिंगबाबतचे अपील जेव्हा थर्ड अंपायरपर्यंत पोहोचते, तेव्हा ते चेंडू बॅटला लागला की नाही हे पाहणार नाहीत. ते फक्त स्टंपिंगबाबतच निर्णय देतील.
आयसीसीने बदललेले नियम १२ डिसेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. जर एखाद्या संघाला स्टंपिंग प्रक्रियेत कॅच-बिहाइंड तपासायचे असेल, तर त्याला आता कॅच-बिहाइंड अपीलसाठी वेगळा डीआरएस पर्याय वापरावा लागेल. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने संघाचा डीआरएसचा पर्याय न वापरता यष्टीमागे झेल घेतल्याबद्दल रिव्ह्यू वापरला होता.
काय म्हटले आहे नियमात?
आयसीसीच्या नवीन दुरुस्तीमध्ये असे म्हटले आहे की, “नवीन नियम स्टंपिंगचे रिव्ह्यू केवळ स्टंपिंगच्या तपासणीपुरते मर्यादित करते, त्यामुळे क्षेत्ररक्षण संघाला रिव्ह्यूदरम्यान इतर कोणत्याही पद्धतीने फलंदाज बाद आहे का नाही तपासणीसाठी मोफत रिव्ह्यू मिळणार नाहीत.”
कन्कशन रिप्लेसमेंट नियमांमध्ये देखील बदल –
आयसीसीने कन्कशन रिप्लेसमेंट नियमांमध्येही अधिक स्पष्टता आणली आहे. दुखापत झालेल्या खेळाडूला गोलंदाजी करण्यापासून निलंबित केले असल्यास, त्याच्या बदली खेळाडूला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त, आयसीसीने मैदानावरील दुखापतींचे मूल्यांकन आणि उपचारासाठी दिलेला वेळ चार मिनिटांपर्यंत मर्यादित केला आहे.
हेही वाचा – IND vs SA 2nd Test : पहिल्याच दिवशी २३ विकेट्स; केपटाऊनवर विकेट कल्लोळ
बीसीसीआय आपले नियम कायम ठेवेल –
आयसीसीच्या नियमांमधील या बदलांसह, बीसीसीआयने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये गेल्या वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीदरम्यान लागू केलेला डेड बॉल आणि प्रति ओव्हर दोन बाऊन्सरचा नियम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.