ICC Annual Team Ranking Updates : आयसीसीने शुक्रवारी वार्षिक संघ रँकिंग अपडेट जाहीर केले. यामध्ये ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर भारताने मर्यादीत षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजे एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. गतवर्षी ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या निर्णायक सामन्यात विद्यमान कसोटी चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारतावर २०९ धावांनी शानदार विजय मिळवला होता. त्यांनी वार्षिक रेटिंगमध्ये भारताला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाचे १२४ गुण आहेत आणि ते त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी आणि गेल्या वर्षीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप उपविजेत्या भारतापेक्षा (१२०) चार गुणांनी पुढे आहेत. त्याचवेळी इंग्लंड (१०५) तिसऱ्या स्थानावर आहे. कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिका (१०३), न्यूझीलंड (९६), पाकिस्तान (८९), श्रीलंका (८३), वेस्ट इंडिज (८२) आणि बांगलादेश (५३) यांनी अनुक्रमे स्थानावर कब्जा केला आहे. वार्षिक रँकिंग अपडेट केवळ मे २०२१ नंतरच्या संघांची कामगिरी लक्षात घेऊन केले गेले आहे. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियात जिंकलेल्या मालिकेचा समावेश नाही. मे २०२१ ते मे २०२३ या कालावधीतील सर्व निकालांना ५० टक्के वेटेज देण्यात आले असून पुढील १२ महिन्यांच्या निकालांना १०० टक्के वेटेज देण्यात आले आहे. यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.

वनडे क्रिकेटमधील वार्षिक क्रमवारी –

भारताने (१२२ गुण) कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे, परंतु वनडे आणि टी२० मध्ये अव्वल स्थानावर आहे. वनडेमध्ये टीम इंडियाने दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा (११६) सहा रेटिंग गुणांची आघाडी घेतली आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊनही, त्या स्पर्धेतील सलग १० विजयांनी टीम इंडियाला मदत झाली. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका (११२) आहे, जे ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त चार रेटिंग गुणांनी मागे आहे, तर पाकिस्तान (१०६) आणि न्यूझीलंड (१०१) पहिल्या पाचमध्ये आहेत. सातव्या क्रमांकावर असलेला श्रीलंका (९३) सहाव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या (९५) अवघ्या दोन रेटिंग गुणांनी मागे आहे. त्याचबरोबर बांगलादेश (८६), अफगाणिस्तान (८०) आणि वेस्ट इंडिज (६९) या संघांचा टॉप १० मध्ये समावेश आहे.

हेही वाचा – SRH vs RR : भुवनेश्वरने हैदराबादला विजय मिळवून देताच काव्या मारनचे खास रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

टी-२० क्रिकेटमधील वार्षिक क्रमवारी –

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारत (२६४) अव्वल आहे. मात्र, भारत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त सात रेटिंग गुणांनी पुढे आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर (२५७) आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानावर (२५२) आहे. दक्षिण आफ्रिका २५० रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता इंग्लंडपेक्षा फक्त दोन रेटिंग गुणांनी मागे आहे. पाकिस्तान (२४७) दोन स्थानांनी घसरून सातव्या तर स्कॉटलंडने (१९२) मोठी झेप घेत १२व्या स्थानावर पोहोचले आहेत. स्कॉटलंडने झिम्बाब्वेला (१९१) मागे टाकून टॉप-१२ मध्ये स्थान मिळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc issue annual team rankings team india lead both odi an t20 formats while australia take top spot in test cricket vbm