Harry Brook trumps Rohit Sharma in latest ICC Test rankings : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट कसोटीत नंबर वन फलंदाज बनू शकतो, अशी अपेक्षा होती. पण त्याची ही संधी थोड्या फरकाने हुकली. मात्र, इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मोठी झेप घेतली आहे. हॅरी ब्रूकने सरशी केल्यामुळए भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला थोडासा फटका बसला आहे. मात्र, यानंतरही भारताचे तीन फलंदाज टॉप-१० मध्ये आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.
कसोटी क्रमवारीत केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर कायम –
आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सध्या त्याचे रेटिंग पॉइंट ८५९ आहेत. मात्र, आता त्याचे अव्वल स्थान धोक्यात आल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा जो रूट त्याच्या अगदी जवळ आला आहे. यावेळीही जो रूट दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्याचे रेटिंग वाढले आहे. आता त्याचे रेटिंग पॉइंट ८५२ पर्यंत पोहोचले आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजामध्ये फक्त सात रेटिंग पॉइंटचा फरक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत जो रूटने मोठी खेळी साकारली, तर त्याला कसोटीतील नंबर वन फलंदाज बनण्याची संधी आहे.
हॅरी ब्रूकने मोठी झेप घेत पटकावले तिसरे स्थान –
यानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मोठी झेप घेत तिसरे स्थान काबीज केले आहे. त्याने चार स्थानांची झेप घेतली असून, आता त्याचे रेटिंग पॉइंट ७७१ वर पोहोचले आहे. हॅरी ब्रूकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला यावेळी क्रमवारीत होताना दिसत आहे. हॅरी ब्रूकने चार स्थानांनी झेप घेतल्याने पाकिस्तानच्या बाबर आझमसह एकूण चार फलंदाजांना आपापल्या स्थानावरून एक स्थान घसरावे लागले आहे.
हेही वाचा – IND vs SL : भारत-श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का! ‘हा’ मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
बाबर आझम आणि रोहित शर्मा यांना एका स्थानाचा फटका –
पाकिस्तानचा बाबर आझम आता ७६८ रेटिंग पॉइंटसह एका स्थानाच्या नुकसानासह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलचेही ७६८ रेटिंग पॉइंट आहेत. त्यामुळे तोही बाबरसह संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथलाही एका स्थानाचा फटका बसला आहे. आता तो ७५७ रेटिंग पॉइंटसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माचीही एका स्थानाने घसरण झाली आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ७५१ असून तो सातव्या क्रमांकावर गेला आहे.
हेही वाचा – VIDEO : ‘आपल्या सर्वांना एक दिवस जायचे आहे, पण…’, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यासाठी कपिल देव भावुक
जैस्वाल-कोहली टॉप-१० मध्ये कायम –
यानंतर भारताचा यशस्वी जैस्वाल आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ७४० असून तो आठव्या क्रमांकावर आहे. त्याच्या स्थानावर कोणताही परिणाम झालेला नाही. श्रीलंकेचा दामुथ करुणारत्ने ७३९ रेटिंगसह नवव्या क्रमांकावर कायम आहे. टॉप-१० मध्ये भारताचा विराट कोहली शेवटच्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग अजूनही ७३७ आहेत. इंग्लंडच्या बेन डकेटनेही ६ स्थानांची झेप घेतली आहे. तो ६८७ रेटिंगसह थेट १६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीनंतरही क्रमवारीत बरेच बदल होऊ शकतात.