आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान मिळवता आलेले नाही. पुरुषांच्या कसोटी संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विन या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी, आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम टी-२० आणि वनडे संघामध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचे नाव नव्हते. आयसीसीच्या टी-२० आणि वनडे संघाचा कर्णधार बाबर आझम कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही.
न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी प्रभावी नेता आहे. वर्षाच्या सुरुवातीला, साउथम्प्टनमध्ये भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याने न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याने ४ सामन्यात ६५.८३च्या सरासरीने शतकासह ३९५ धावा केल्या. संघात समाविष्ट असलेल्या तीन भारतीय खेळाडूंपैकी रोहित शर्माची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे.
रोहितने कॅलेंडर वर्षात दोन शतकांसह ९०६ धावा केल्या. प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्धची त्याची दोन्ही शतके संस्मरणीय होती. भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा पहिला-पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या यादीत स्थान मिळवणारा तिसरा भारतीय अश्विन आहे, ज्याचा जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये समावेश आहे. अश्विनने ९ सामन्यात ५४ विकेट घेतल्या. विराट कोहलीला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-२०, एकदिवसीय आणि सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.
आयसीसी वर्षातील कसोटी संघ (पुरुष): दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लॅबुशेन, जो रूट, केन विल्यमसन (कप्तान), फवाद आलम, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, काइल जेम्सन, हसन अली, शाहीन आफ्रिदी.