पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस आणि ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज व यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात येणार आहे. या मांदियाळीत समावेश होणारा युनूस ७०वा, तर गिलख्रिस्ट ७१वा खेळाडू असणार आहे. पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात दुबई येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान वकारला, तर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील पर्थ कसोटीदरम्यान गिलख्रिस्टला ‘हॉल ऑफ फेम’मध्ये अनौपचारिकररीत्या समाविष्ट केले जाणार आहे. रिव्हर्स स्विंगचा किमयागार असलेल्या युनूसने ८७ कसोटींत ३७३, तर २६२ एकदिवसीय सामन्यांत ४१६ बळी घेतले आहेत. याव्यतिरिक्त १७ कसोटी आणि ६२ एकदिवसीय सामन्यांत त्याने पाकिस्तानचे कर्णधारपदही भूषवले आहे. गिलख्रिस्टच्या नावावर ९६ कसोटींत ५५७० धावांसह यष्टीपाठी ४१६ बळींची नोंद आहे. याचप्रमाणे २८७ एकदिवसीय सामन्यांत ९६१९ धावांसह यष्टीपाठी ४७२ बळी त्याच्या नावावर आहेत. विश्वचषक विजेत्या १९९९, २००३, २००७च्या ऑस्ट्रेलियन संघाचा गिलख्रिस्ट अविभाज्य घटक होता.

Story img Loader