जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात मैदानावर झालेल्या वादाच्या घटनेनंतर खेळाडूंसाठीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेमध्ये बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी चर्चा ऐरणीवर होती. परंतु आचारसंहितेत बदल करण्याची कोणतीही योजना नसल्याचे आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे. आयसीसी खेळाडूंच्या आचारसंहितेमध्ये बदल करणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही शक्यता श्रीनिवासन यांनी फेटाळून लावली आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनेसुद्धा अँडरसन प्रकरणी टीका केली होती. अँडरसनला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे क्रिकेटमधील प्रशासकांकडून चुकीचा संदेश जात आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ब्रॉडच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया
मँचेस्टर : चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहा बळी घेऊन भारताच्या डावाला खिंडार पाडणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गुडघ्यावर मालिका संपल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ‘‘ओव्हलमधील पाचव्या कसोटीनंतर मी स्वीडनला प्रयाण करणार आहे. फक्त संघव्यवस्थापनाने सूचना दिल्यास ही शस्त्रक्रिया एकदिवसीय मालिकेनंतर होणार आहे,’’ असे ब्रॉडने सांगितले. ‘‘गेल्या १८ महिन्यांत मला गुडघ्याच्या दुखापतीने पछाडले आहे. त्यामुळे आता या शस्त्रक्रियेची नितांत आवश्यकता आहे,’’ असे तो पुढे म्हणाला. या शस्त्रक्रियेनंतर ब्रॉडला १४ आठवडे विश्रांतीची आवश्यकता असेल. २५ ऑगस्टपासून भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे.