Shubaman Gill on Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज म्हणून कायम आहे. भारतीय सलामीवीर शुबमन गिलला अव्वल स्थानावर जाण्याची संधी असताना, तो जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज होण्यापासून वंचित राहिला आहे कारण, त्याला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वन डेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बाबर आझम ८५७ रेटिंग गुणांसह अव्वल तर शुबमन ८४७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७४ आणि १०४ धावा केल्या होत्या. जर त्याने आणखी २२ धावा केल्या असत्या तर त्याने बाबरला मागे टाकले असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीने बुधवारी (२७ सप्टेंबर) जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत शुबमन गिलने दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले असून तो आता पहिल्या क्रमांकावर असलेला फलंदाज बाबर आझमच्या जवळ आहे. उजव्या हाताचा फलंदाज शुबमन अलीकडच्या काही आठवड्यांत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघासाठी आगामी वर्ल्डकप पाहता ही जमेची बाब आहे.

शुबमन गिल आशिया कप २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, जिथे त्याने ७५ पेक्षा जास्त सरासरीने ३०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शुबमन गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७४ धावा आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०४ धावा केल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला विश्रांती देण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन आयसीसी क्रमवारीत शुबमन गिलपेक्षा ७४३ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावर आयर्लंडचा हॅरी टेक्टर ७२९ रेटिंग गुणांसह आहे. अव्वल दहामध्ये गिलनंतर विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे कारण तो ९व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यानेही आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत प्रगती केली आहे. अय्यरने आठ स्थानांनी प्रगती करत ३०व्या स्थानावर, तर राहुलने सहा स्थानांनी झेप घेत ३३व्या स्थानावर झेप घेतली आहे. अय्यरने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले तर राहुलने पहिल्या दोन वन डेत अर्धशतके झळकावली.

हेही वाचा: Asian Games 2023: गोल्डन गर्ल्स! नेमबाजीत भारताच्या मुलींनी फडकवला झेंडा, कोण आहेत मनू भाकर, ईशा आणि रिदम सांगवान?

शुबमन गिलची प्रतीक्षा वाढली

वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघर्ष करणाऱ्या शुबमन गिलने आशिया कप २०२३ मध्ये शानदार पुनरागमन केले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेतही त्याने आशिया चषकाची गती कायम ठेवली. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता गिलला ५ ऑक्टोबरपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc odi ranking shubman gill becomes a threat to babar azams reign know who is where avw