आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आयसीसीच्या गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसरे स्थान गाठले आहे. चॅम्पियन्स मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या क्रमवारीला आणखी बळकटी आली आहे. सध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार भारतीय संघ क्रमवारीत १२३ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. चॅम्पियन्स मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा रविंद्र जडेजानेही त्याच्या क्रिकेट करिअरमधील अव्वल स्थान गाठले आहे. जडेजा आयसीसी गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. चॅम्पियन्स करंडक मालिकेत १२ विकेट्स घेऊन मालिकेचा ‘गोल्डन बॉल’ चषकाचा मानकरी ठरला. त्याचबरोबर मालिकेच्या अंतिम सामन्यात २४ चेंडूत नाबाद ३३ धावा जडेजाने ठोकल्या होत्या.