भारतीय कर्णधार विराट कोहली याने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. आज आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट ९११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. विराटने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे ७५, ४५ आणि ७१ धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला संघाला मालिका विजय मिळवून देता आला नाही. परंतु, त्याला या मालिकेअंती क्रमवारीत २ गुण मिळाले. या दोन गुणांमुळे तो ९११ गुणांवर पोहोचला. विराटची ही एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोकृष्ट कामगिरी आहे.
आयसीसी क्रमवारीतील सर्वाधिक गुणांचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्या नावावर आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मार्च १९९१ मध्ये ९१८ गुण मिळवले होते. त्या गुणांच्या जवळ आज विराट पोहोचला आहे.
याशिवाय, चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याचीही क्रमवारीत बढती झाली आहे. कुलदीपने या मालिकेत एकूण ९ बळी टिपले. त्यापैकी ६ बळी त्याने पहिल्या सामन्यात टिपले होते. मात्र पुढील २ सामन्यात त्याला केवळ ३ बळी टिपता आले. पण त्याच्या संपूर्ण मालिकेतील कामगिरीच्या जोरावर त्याला या क्रमवारीत सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.
टॉप १० मध्ये स्थान मिळवणारा कुलदीप हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याशिवाय जसप्रीत बुमरा (१) आणि युझवेन्द्र चहल (१०) हे गोलंदाज पहिल्या १० मध्ये आहेत. याशिवाय आदिल रशीद (२), इम्रान ताहीर (७) आणि युझवेन्द्र चहल (१०) यांच्यानंतर टॉप १० मध्ये विराजमान होणारा तो चौथा फिरकीपटू ठरला आहे.