आयपीएल व बांगलादेश प्रीमिअर लीग स्पर्धेत स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे हात पोळल्यानंतर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) करडी नजर ठेवली आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समितीने खेळाडूंवर अनेक बंधने घातली आहेत. सामन्याला जाताना बसमध्ये बसण्यापूर्वी खेळाडूंनी आपले मोबाइल संघ व्यवस्थापकाकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. समितीचे अधिकारी खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवणार आहे. भाग घेतलेल्या आठ संघांपैकी सहा संघांतील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचारीवर्गाला या समितीने मार्गदर्शन केले. फिक्सिंग किंवा सट्टेबाजीबाबत जर संशय आला, तर लगेचच या समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला संघांच्या व्यवस्थापकांना देण्यात आला आहे. न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी असल्यामुळे या संघांच्या खेळाडू व सहाय्यकांना नंतर मार्गदर्शन केले जाणार आहे.
क्रिकेटपटूंच्या संघटनेचे प्रमुखपद टीम मे यांनी सोडले
सिडनी : गेली आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे प्रमुखपद सांभाळणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टीम मे यांनी आरोप-प्रत्यारोप आणि गैरव्यवहारांना कंटाळून हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळाडूंच्या संघटनेचे काम पाहात असताना भारताकडून येणाऱ्या दडपणामुळे पद सोडत असल्याचे मे यांनी सांगितले आहे. या यंत्रणेशी भांडून थकल्यामुळे अखेर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.‘‘गैरव्यवहारांचे आरोप दिवसेंदिवस वाढत होते. या साऱ्या गोष्टी कामाबरोबरच बाहेरही त्रासदायक ठरत असल्यामुळे हे पद सोडण्याचा निर्णय घेतला,’’ असे मे यांनी सांगितले.गेल्या महिन्यात आयसीसीच्या क्रिकेट समितीमध्ये खेळाडूंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टीम मे यांच्या जागी भारताच्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची निवड करण्यात आली होती. यावेळी मतपत्रिकेचे ‘फिक्सिंग’ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर मे यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा