भारताचा दौरा अर्धवट सोडल्याप्रकरणी झालेली नुकसान भरपाईची रक्कम वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ भरू शकली नाही, तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कारवाई करू शकते. पण यासाठी बीसीसीआयला आयसीसीकडे दाद मागावी लागेल. त्यानंतर आयसीसी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर निलंबनाची कारवाई करू शकते.
सध्याच्या घडीला आयसीसीने कोणतेही पाऊल उचलले नाही, पण १० नोव्हेंबरला आयसीसीची बैठक होणार असून त्यामध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी दोन्ही मंडळांनी परस्पर संमतीने हे प्रकरण मिटवावे, अशी भूमिका आयसीसीने घेतली आहे.
‘‘दोन्हीही पक्ष हे प्रकरण सामोपचाराने सोडवतील, अशी आम्हाला आशा आहे. ही द्विपक्षीय मालिका भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होती, त्यामुळे आयसीसी थेट या प्रकरणात लक्ष घालू शकत नाही. पण जर बीसीसीआयने आमच्याकडे याबाबत दाद मागितली तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ शकतो,’’ असे आयसीसीने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने, तीन कसोटी सामने आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामने खेळणार होता. पण नवीन मानधनाच्या करारांतील मतभेदामुळे वेस्ट इंडिजचा संघ चौथा एकदिवसीय सामना खेळून मायदेशी परतला. यामुळे अंदाजे ६५ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान बीसीसीआयला झाले असून याची भरपाई वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने करावी, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
जर वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ ही नुकसानभरपाई भरू शकले नाही, तर त्यांना विश्वचषक आणि आयसीसीच्या स्पर्धामधून मिळणारी रक्कम बीसीसीआयकडे वळती करून त्यांचे नुकसान भरून काढण्यात येऊ शकते. यामध्ये आयसीसी वेस्ट इंडिजवर निलंबनाचीही कारवाई करू शकते. पण ही सर्व कारवाई करण्यापूर्वी आयसीसीला वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला याबाबत नोटीस द्यावी लागेल, त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते.

Story img Loader