ICC Rankings, Team India No.1: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (२२ सप्टेंबर) सुरुवात झाली. टीम इंडियाचा कार्यवाहक कर्णधार के.एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.४ षटकात २८१ धावा करत सामना जिंकला. या विजयासह भारत आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो आधीच टी२० आणि कसोटीत अव्वल होता. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा तो दुसरा संघ ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. २०१४ मध्ये तो एकाच वेळी कसोटी, वन डे आणि टी२० मध्ये पहिल्या क्रमांकावर होता. भारताने ही कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहेत.

जय शाह म्हणाले की, “हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल #TeamIndia चे हार्दिक अभिनंदन. या संघाने मैदानावर शानदार कामगिरी केली आहे. या यशाचा पाठलाग करताना घेतलेली मेहनत ही क्रमवारी दर्शवते. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने ही विलक्षण कामगिरी केली आहे.” नुकताच आशिया चषक जिंकून आलेल्या भारताला सूर्यकुमार यादव फॉर्मात आल्याने मोठा दिलासा मिळाला. या विजयासह टीम इंडियाने वन डे क्रमवारीत नंबर १चा किताब मिळवला. ११६ रेटींग पॉईंटसह टीम इंडिया आता अव्वल स्थानी आहे आणि त्यांनी पाकिस्तानला (११५) दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.

सामन्यात काय झाले?

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ५२, जोश इंग्लिसने ४५ आणि स्टीव्ह स्मिथने ४१ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले

भारताने १९९६ नंतर म्हणजेच २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. १९९६ नंतर आता भारतीय संघाने बाजी मारली आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने मागील चार एकदिवसीय सामने जिंकले होते. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना २४ सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc rankings india becomes number 1 in all three formats of icc reaches top in odi after test and t20 avw