बुधवारी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचा पुरावा आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकून सिराज प्रथमच एकदिवसीयमध्ये अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे.

गेल्या १२ महिन्यांत सिराजचा फॉर्म अप्रतिम राहिला आहे. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या गोलंदाजीत अलीकडच्या काळात किती सुधारणा झाली आहे हे दाखवून दिले आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी गेल्या वर्षी सिराजला त्याच्या गोलंदाजीच्या काही पैलूंवर काम करण्याचा सल्ला दिला होता आणि या उत्साही खेळाडूने घेतलेल्या अतिरिक्त मेहनतीचे फळ मिळाले आहे.

श्रीलंकेविरुद्ध नऊ विकेट्स घेत तीन सामन्यांच्या मालिकेत सिराज आघाडीचा गोलंदाज बनला तर न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच पूर्ण झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात चार बळी मिळवून त्यात भर घातली. याचा अर्थ सिराजने ७२९ रेटिंग गुणांसह एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियन हेझलवूडपेक्षा फक्त दोन रेटिंग गुणांनी आघाडीवर आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत व्हाईटवॉश झाल्यानंतर उदयोन्मुख वेगवान गोलंदाजाबद्दल विचारले असता भारताचा कर्णधार रोहित शर्माने सिराजचे कौतुक केले. रोहित म्हणाला, “त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे, संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे त्याला समजले आहे. नवीन चेंडूने सुरुवात करणे, चेंडू स्विंग करणे, लवकर विकेट घेणे तसेच मधल्या षटकांमध्येही कामगिरी करण्याचे त्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. तो जितका जास्त खेळतो तितकी चांगली कामगिरी करतो.”

सिराजचा सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय गोलंदाजांच्या अद्ययावत यादीत एकूण ११ स्थानांनी झेप घेत एकूण ३२व्या स्थानावर पोहोचला आहे. किवीविरुद्ध भारताची मायदेशातील मालिका पूर्ण झाल्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत बरीच हालचाल झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, परंतु आता एकूण तीन भारतीय खेळाडू अव्वल १० मध्ये आहेत आणि सर्वोच्च पुरस्काराचा पाठलाग करत आहेत.

हेही वाचा: IND vs NZ T20: टीम इंडियाला टी२० मालिकेआधी मोठा झटका, मराठमोळ्या स्टार फलंदाजाला दुखापतग्रस्त; रणजी त्रिशतकवीराचा संघात समावेश

फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुबमन गिल लक्षवेधी ठरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर शानदार द्विशतक आणि शतक झळकावल्यानंतर त्याने एकूण २० स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर सातव्या क्रमांकावर घसरलेल्या अनुभवी विराट कोहलीसमोर गिलचा उदय झाला आहे, तर इंदोरमध्ये किवीजविरुद्ध झटपट शतक झळकावल्यानंतर रोहितने दोन स्थानांनी झेप घेत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.