ICC ODI Rankings: आयसीसीने बुधवारी (२५ ऑक्टोबर) विश्वचषकादरम्यान नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. भारताचा सलामीचा फलंदाज शुबमन गिल पहिल्या स्थानावर पोहोचण्याच्या जवळ आहे. एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची आघाडी सहा गुणांनी घसरली आहे. उत्कृष्ट फॉर्मात असलेला शुबमन त्याच्या जवळ पोहोचला आहे. चालू विश्वचषकात पाच डावात १५७ धावा केल्या असूनही बाबरचे रेटिंग घसरले आहेत, त्यामुळे त्याचे अव्वलस्थान धोक्यात आले आहे.
दुसरीकडे गिलने भारतासाठी केवळ तीन सामन्यांत ९५ धावा केल्या आहेत. पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या ५३ धावांच्या खेळीच्या जोरावर उजव्या हाताचा फलंदाज गिलने ८२३ रेटिंग पॉइंट्स गाठले आहेत. बाबरच्या अव्वल रँकिंगच्या जवळ जाणारा तो एकमेव खेळाडू नाही. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकही जवळ आला आहे. डी कॉकने वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली असून तीन शतके झळकावली आहेत. तो तिसऱ्या स्थानावर आहे.
विराट आणि वॉर्नर एकाच ठिकाणी
डी कॉकचा सहकारी हेनरिक क्लासेनला सात स्थानांचा फायदा झाला. तो चौथ्या स्थानावर आला आहे. ही त्याची वन डेतील आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे. त्याचबरोबर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांनाही फायदा झाला आहे. विराटने तीन तर वॉर्नरने दोन स्थानांची झेप घेतली आहे. दोघेही संयुक्तपणे पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलने १६ स्थानांची मोठी झेप घेतली असून तो १३व्या क्रमांकावर आला आहे.
सिराज, महाराज, नबी आणि झंपाचा फायदा
वन डेमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पहिल्या स्थानावर आहे. मात्र, अनेक गोलंदाज त्याला अव्वल स्थानावरून दूर करण्याच्या जवळ आले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी ऑफस्पिनर मोहम्मद नबीने चार स्थानांनी झेप घेतली असून तो सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पानेही चार स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर पोहोचले आहे. हार्दिक पांड्याची दुखापत ही फारशी गंभीर नाही आणि तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. टीम इंडियाचा पुढील सामना येत्या रविवारी २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे.