आयपीएलसदृश स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धामध्ये भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहारात अडकलेले खेळाडू, पंच तसेच सामनाधिकारी, संघमालक यांच्यावर कारवाईसाठी भ्रष्टाचारविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची सूचना आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाने संलग्न बोर्डाना केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा विभागाचे अध्यक्ष सर रॉनी फ्लॅनगन यासंदर्भात आयसीसीच्या वार्षिक परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत. खेळाडू, पंच, संघमालक यांच्यासमोर कोणते धोके आणि आव्हाने आहेत यासंदर्भात फ्लॅनगन सदस्य बोर्डाना संबोधित करणार आहेत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी ते काही शिफारसी मांडणार आहेत.
इंडियन प्रीमिअर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि श्रीलंका प्रीमिअर लीग स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या वाढत्या प्रकारांच्या पाश्र्वभूमीवर कठोर कायद्यांची आवश्यकता निर्माण झाल्याचे फ्लॅनगन यांनी स्पष्ट केले.

Story img Loader