आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यापूर्वीच नवनवीन मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. यंदा होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. सुरूवातीला बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयसीसीने देखील तटस्थ निर्णय घेत भारताचे सामने हायब्रिड मॉडेलवर खेळवत दुबईत होतील, असा निर्णय दिला. तर यापुढे पाकिस्तानचा संघही भारतात सामने खेळणार नाही, त्यांचे सामनेदेखील भारताकडे यजमानपद असल्यास हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवले जातील. तर आता यजमान पाकिस्तानचे नाव भारतीय संघाच्या जर्सीवर नसेल अशा बातम्या समोर येत आहेत. यावर आता आयसीसीने वक्तव्य केलं आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) ने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या जर्सीवर यजमान पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकार दिल्याचे रिपोर्ट समोर आले होते. यावर पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयला सुनावलं होतं. साधारणपणे सर्व संघांच्या जर्सीवर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद असलेल्या देशाचे नाव असते, मात्र भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसणार आहे, या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे.

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास नकार दिल्याचे म्हणत बीसीसीआयवर ‘क्रिकेटमध्ये राजकारण’ आणल्याचा आरोप केला. यापूर्वी, भारतीय बोर्डाने कर्णधार रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधारांच्या बैठकीसाठी पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता, असे ते म्हणाले. पण बीसीसीआयने मात्र असे कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नव्हते.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव काढून टाकण्याचा विचार करत असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांचे आयसीसीने नुकतेच खंडन केले आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की सर्व संघांनी त्यांच्या जर्सीवर स्पर्धेचा अधिकृत लोगो असणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये यजमान देशाचे नाव देखील समाविष्ट आहे, ए स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार. “टूर्नामेंटचा लोगो आपल्या जर्सीवर लावणं ही प्रत्येक संघाची जबाबदारी आहे. सर्व संघांनी हा नियम पाळणे बंधनकारक आहे.”

भारतीय संघाच्या जर्सीबाबत समोर आलेल्या रिपोर्ट्नंतर हे वक्तव्य समोर आले होते. आयसीसीने असेही स्पष्ट केले की जे संघ लोगो योग्यरित्या जर्सीवर वापरणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हे वृत्त निराधार असल्याचे नाकारले आणि बोर्डाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने कोणत्याही भारतीय मीडिया आउटलेटशी या विषयावर चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले. पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान आयसीसीचे हे वक्तव्य आले आहे.

आयएएनएसच्या अहवालात असे म्हटले होते की बीसीसीआयला संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिलेले नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय बोर्डाकडून अशी कोणतीही माहिती मिळाल्याचे नाकारले आहे. विशेषत: भारतीय बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून खूपच तणावपूर्ण आहे.

Story img Loader