वर्ल्ड कपमधल्या पहिल्याच सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला, परंतु चर्चा जास्त रंगली ती धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय लष्कराच्या बलिदान चिन्हाची. आयसीसीनं या निशाणावर आक्षेप घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला हे चिन्ह काढायला सांगितले. यावरून भारतीय क्रिकेटप्रेमी संतापले असून त्यांनी धोनीच्या मागे खंबीरपणे उभं काहण्याची बीसीसीआयकडे मागणी केली आहे. सध्या ट्विटरवर सध्या टॉपला असलेला ट्रेंड आहे #DhoniKeepTheGlove.

धोनीला भारतीय सैन्यानं टेरिटोरियल आर्मीचं मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देऊन गौरवलेलं आहे हे विशेष. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला धोनीनं वाहिलेली आदरांजली असा अर्थ भारतीय क्रीडाप्रेमी काढत असले तरी आयसीसीनं मात्र नियमावर बोट ठेवलं आहे. जर आयसीसीचे नियम काय आहेत बघितलं तर आयसीसीनं का आक्षेप घेतला हे लक्षात येतं.

काय आहेत आयसीसीचे कपडे व उपकरणांच्या वापराबाबतच्या अटी व शर्ती:

यात असं नमूद केलंय की, “विकेट किपरच्या ग्लोव्हजवर उत्पादकाची दोन डिझाईन वा लोगो वापरण्यास अनुमती आहे. दिसून येतील असे कुठलेही लोगो जे मंजूर केलेले नाहीत ते वापरता येणार नाहीत.” आयसीसी केवळ राष्ट्रीय लोगो, व्यापारी लोगो, इव्हेंट लोगो, उत्पादकाचा लोगो, खेळाडूच्या बॅटवरील लोगो, चॅरिटी किंवा अव्यापारी लोगो किटवर प्रिंट करण्यास अनुमती देते. लष्कराचं बलिदान चिन्ह असलेला लोगो या यादीत बसत नसल्यानं आयसीसीनं या लोगोवर आक्षेप घेतला आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार या अटी व शर्तींमध्ये न बसणारे लोगो वापरण्यास कडक बंदी आहे. तसेच असं काही खेळाडुंनी केलेलं आढळून आल्यास व आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यास सामनाधिकाऱ्याला सदर खेळाडूला, जोपर्यंत उल्लंघन केलेली बाब सुधारत नाही तोपर्यंत योग्य वाटल्यास मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे. कार्यकारी समितीच्या परवानगीखेरीज कुठल्याही प्रकारचे संदेश वेगवेगळ्या पट्ट्यांच्या वगैरे कुठल्याही माध्यमातून देता येणार नाहीत असेही आयसीसीचे नियम सांगतात.

Story img Loader