ICC shares video of Australian players: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ७ जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियन खेळांडूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू विराट कोहलीबद्दल एका वाक्यात व्यक्त होताना दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स विराट कोहलीचे एका शब्दात वर्णन करताना म्हणाला, “चांगला खेळाडू आणि स्पर्धा करण्यासाठी नेहमीच तयार असतो.” विराट, केन विल्यमसन आणि जो रुट यांच्यासह आधुनिक युगातील ‘फॅब फोर’ फलंदाजीचा एक भाग असलेल्या विराट कोहलीबद्दल स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला ” तो सुपरस्टार आहे.”
स्मिथ पुढे म्हणाला, “त्याला आमच्याविरुद्ध खेळायला आवडते. तो नेहमी आमच्याविरुद्ध धावा करतो, आशा आहे की या आठवड्यात आम्ही त्याला शांत ठेवू शकू.” सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विराटचे वर्णन करताना म्हणाला, “अविश्वसनीय कव्हर ड्राइव्ह खेळणारा खेळाडू आहे.” मार्नस लॅबुशेन म्हणाला, “तो सर्व काळातील महान खेळाडूंपैकी एक आहे आणि सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू आहे.”
विराट कोहलीबद्दल अष्टपैलू कॅमेरून ग्रीन म्हणाला की, विराट ‘मॅन ऑफ इंडिया’ आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला, “भारतीय मधल्या फळीचा कार्यक्षम कणा आहे.” विराटला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला खूप आवडतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २४ कसोटींमध्ये त्याने ४८.२६ च्या सरासरीने १,९७९ धावा केल्या आहेत. ज्यात आठ शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १८६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर).