भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला धक्काबुक्की आणि अपशब्द वापरल्याबद्दल इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) न्यायआयुक्त गॉर्डन लुईस यांनी निर्दोष ठरवल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्याकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. पण आयसीसीने ही सूचना फेटाळून लावल्यानंतर बीसीसीआयमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. आयसीसीने नियमांमध्ये बदल करावा, असे मत बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी व्यक्त केले आहे.
‘‘आयसीसीच्या नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे असे मला वाटते. न्यायआयुक्त गॉर्डन लुईस यांच्या निर्णयाविरोधात बीसीसीआय अपील करू शकत नाही, तर ही प्रक्रिया आयसीसी करू शकते. मी बीसीसीआयमधील व्यक्तींशी आणि वकिलांशी आयसीसीच्या नियमांच्या प्रक्रियेबाबत बोललो असून त्यांना या गोष्टी अधिकाधिक कडक कशा करता येतील, याबाबत सांगितले आहे. जेव्हा आमच्याकडून ही प्रक्रिया पूर्ण होईल, तेव्हा याबाबतचा ई-मेल आम्ही आयसीसीला पाठवून यावर विचारविनिमय करण्यासाठी विनंती करणार आहोत,’’ असे पटेल यांनी सांगितले.
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहाराला जाताना अँडरसनने जडेजाला धक्काबुक्की आणि अपशब्द वापरले होते. पण याबाबतचा कोणताच दृक्श्राव्य पुरावा मिळाला नाही. याबाबत पटेल म्हणाले की, ‘‘आयसीसीला मी याप्रकरणात दृक्श्राव्य पुरावे न मिळाल्याबद्दलही लिहिणार आहे, अशा गोष्टी घडू नये. हे सारे मी खेळामध्ये चांगले शासन राहावे, यासाठी करणार आहे.’’

Story img Loader