T20 Women’s World Cup 2024: सरकारी नोकऱ्यांमध्ये व शिक्षणात देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाचं हिंसाचारात रुपांतर झालं असून हा हिंसाचार थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचला. त्यामुळे शेख हसीना यांनी देशाचं प्रमुखपद व देश सोडून नवी दिल्ली गाठली आहे. दरम्यान, महिला टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत आयसीसीने मोठं वक्तव्य केले आहे. ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये महिला टी-२० विश्वचषक होणार आहे. ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, पण आता हा विश्वचषक होणार की नाही जाणून घ्या.
ढाका येथे शेख हसीना यांच्या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झामा यांनी सोमवारी सांगितले की, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार सत्तेवर येईल. गेल्या दोन दिवसांत देशात पसरलेल्या हिंसाचारात १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती पाहता आयसीसीकडून बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत पुनर्विचार होऊ शकतो. मात्र या मुद्दयावर आयसीसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
बांगलादेशमध्ये महिला टी-२० विश्वचषक आयोजित करण्याबाबत आयसीसीच्या एका सदस्याने सांगितले की, ‘आयसीसीकडे सर्व सदस्य देशांमध्ये एक स्वतंत्र सुरक्षा मॉनिटरिंग सिस्टम आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, परंतु स्पर्धा सुरू होण्यास सात आठवडे शिल्लक असल्याने ही स्पर्धा बांगलादेशातून हलवली जाईल की नाही यावर भाष्य करणे खूप घाईचे आहे.
बांगलादेशमधील परिस्थिती पाहता भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तेथील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय महिला संघ बांगलादेशला जाणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आयसीसीकडे अशा परिस्थितींसाठी आकस्मिक योजना आहेत आणि बांगलादेशमध्ये होणारी स्पर्धा जर रद्द होणार असेल तर श्रीलंका हा पर्याय असू शकतो. २०१२ च्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन श्रीलंकेने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान केले होते.