एकदिवसीय क्रिकेटमधील नव्या नियमांमुळे गोलंदाजांची कत्तल होत असली तरी आयसीसीने मात्र या नियमांचे समर्थन केले आहे. ‘‘नव्या नियमांना चांगले यश मिळाले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही सध्या बरेच बदल केले आहेत. २०१५मध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, या नियमांमध्ये तूर्तास कोणतेही बदल केले जाणार नाहीत. आता याविषयी चर्चा करण्यासाठी आयसीसीच्या क्रिकेट समितीची बैठक पुढील वर्षी मे महिन्यात होणार आहे,’’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘एका डावात सरासरी धावा काढण्याचे प्रमाण २५० इतके आहे. पण आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, या ५० धावांपैकी जास्त धावा या चौकार आणि षटकार लगावून काढल्या आहेत. क्रिकेट हा खेळ उत्कंठावर्धक आणि आकर्षक बनवण्यासाठीच आम्ही क्षेत्ररक्षणावर र्निबध घातले होते. आक्रमक क्रिकेट खेळताना धावा जास्त निघत असून बळीसुद्धा जास्त बाद होत आहेत. एकूण धावा मात्र तेवढय़ाच निघत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान हे नवे नियम लागू करण्यात आले होते. त्यावेळी भारतातील खेळपट्टय़ांकडून गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती. पण भारतीय उपखंडाबाहेरील परिस्थिती वेगळी आहे, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.’’
फक्त न्याय हक्काची मागणी -संजय पटेल
मुंबई : ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आर्थिक मिळकतीपैकी काही रकमेची मागणी बीसीसीआयने केली होती. आम्ही केवळ आमच्या न्याय हक्काची मागणी करत आहोत,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘आयसीसीच्या पूर्ण सदस्यत्व असणाऱ्या देशांसमोर हा मुद्दा मांडण्यात आला. यात वर्चस्व गाजवण्याचा कोणताही विषय नाही. हा नियमानुसार आमचा हक्क आहे. बीसीसीआयच्या इतिहासात पहिल्यांदाच आयसीसीपुढे असा प्रस्ताव मांडला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सविस्तर अभ्यास करून हा प्रस्ताव सादर केला आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा