पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भात मोठी चर्चा क्रीडाविश्वास पाहायला मिळत होती. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? कुणाची संधी हुकणार? याविषयी चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर, त्यासंदर्भात आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर घोषणा करण्यात आली. पुढील महिन्यात १७ ऑक्टोबरपासून ICC Mens T20 World Cup ला सुरुवात होणार असून १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमींसाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजे कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचं कमबॅक!

T20 World Cup स्क्वाडसोबत धोनीही!

ओमान आणि यूएईमध्ये भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ख्याती असणारा महेंद्रसिंह धोनी देखील टीम इंडियासोबत असणार आहे. अर्थात, धोनीनं आयपीएल वगळता इतर सर्व क्रिकेट प्रकारांमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो टीम इंडियामध्ये नेमकं काय करणार आहे? याची उत्सुकता धोनीच्या चाहत्यांना लागली होती. त्यासंदर्भात बीसीसीआयनं घोषणा केली आहे.

 

धोनी पुन्हा रणनीती करताना दिसणार!

भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमसोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे. यंदाच्या T20 World Cup मध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानावर खेळणारा धोनी जरी पाहता येणार नसला, तरी मैदानाबाहेर राहून रणनीती करणारा धोनी त्यांना पाहता येणार आहे.

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा!

असा असेल भारतीय संघ!

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.

Story img Loader